विनयभंग प्रकरणी आरोपीस दोन वर्षांची शिक्षा

| अलिबाग | प्रतिनिधी |

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अलिबाग न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी एस.डब्ल्यू उगले यांनी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. शिल्पेश अनिल पोवळे असे या आरोपीचे नाव आहे.

9 नोव्हेंबर 2016 रोजी आरोपी शिल्पेश पोवळे पिडीत महिलेच्या घरी आला व तुझ्याकडे काम आहे. बाहेर चल असे सांगून तिला घराबाहेर बोलावले. पिडीत महिलेने बाहेर येण्यास नकार दिल्यामुळे आरोपी शिल्पेश याने तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच, हात पकडून घरातून बाहेर नेऊन तिचा विनयभंग केला. याबाबत पिडीत महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शिल्पेश याच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबतची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी एस.डब्ल्यू उगले यांच्यासमोर झाली. शिल्पेशला दोषी ठरवून मुख्य न्यायदंडाधिकारी उगले यांनी त्यास 2 वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी वकील नईमा इम्रान घट्टे यांनी फिर्यादीची बाजू मांडली. त्यांना पोलीस हवालदार आर.आर. नाईक, पोलीस हवालदार जी.के. हाके व लिपीक राम ठाकूर यांनी सहकार्य केले.

Exit mobile version