बलात्कारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

। पनवेल । प्रतिनिधी ।

अल्पवयीन पीडितेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पनवेल येथील सत्र न्यायालयात आरोपीला दोषी धरून जन्मठेप व 25 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. रवींद्र महादेव जाधव असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी रवींद्र जाधव (50) याने सप्टेंबर 2013 मध्ये अल्पवयीन पीडितेच्या घरी ती एकटी असल्याचा फायदा घेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध केले व आईवडील व इतर कोणाला सांगितल्यास, तुझी जीभ तोडून टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर सप्टेंबर 2013 ते जून 2014 या कालावधीमध्ये वेळोवेळी पीडित मुलीच्या घरी कोणी नसताना त्याने शरीरसंबंध केले. त्यामुळे पीडिता आठ महिन्यांची गरोदर राहिली. तिच्या आईने तिची तब्बेत ठीक नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता, ती आठ महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकाराबाबत पीडितेच्या आईने तिला विचारले असता पीडिताने आरोपीने हा प्रकार जबरदस्तीने केल्याचे सांगितले. याप्रकरणी आरोपीविरूद्ध खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला.

खोपोली पोलिसांनी सदरच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी सहा. अति. सत्र न्यायाधीश शाइदा शेख यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता, ॲड. प्रतिक्षा वडे- वारंगे यांनी एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये पीडित मुलीची आई, पीडित मुलगी तसेच वैद्यकीय अधिकारी आणि तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तपासिक अंमलदार आर.एन. राजे, सहा. पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस ठाणे यांचा तपास महत्त्वाचा ठरला तसेच पैरवी म.पो.शि दीक्षा राठोड व पो.शि. स्वप्नील पानसरे यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले.

Exit mobile version