मातीच्या मडक्यांना अच्छे दिन

वाढत्या गरमीमुळे माठाला अधिक पसंती

| वडखळ | वार्ताहर |

मागील दोन आठवड्यांपासून वातावरणात वाढत असलेल्या गरमीमुळे अनेकांनी बचावात्मक पवित्रा घेत अनेक वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे फ्रीजऐवजी अनेकजण मातीच्या मडक्यातील थंड पाण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे कुंभाराच्या मातीच्या मडक्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.

जुन्या काळातील माठाचा वापर मधल्या काळात कुठेतरी लोप पावत चालला होता. त्यातच कुंभारांना मडकी बनविण्यासाठी लागणारी माती, लाकडे, तूस, राखाडी या गोष्टी आजच्या डिजिटल युगात मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे कुंभारांच्या व्यवसायावर गदा आली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात अनेकांनी आपल्या जीवनशैलीत बदल केले. पिण्याच्या थंड पाण्यासाठी फ्रीजचा वापर कमी करून मातीच्या माठांना अधिक पसंती मिळू लागली. त्याचा परिणाम गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर मातीच्या मडक्यांची जोरदार विक्री सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेने यंदा मातीच्या मडक्यांच्या विक्रीमध्ये जवळपास दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारात मोठा माठ पाचशे रुपये, मध्यम आकाराचा तीनशे रुपये आणि लहान आकाराचा माठ दोनशे रुपयांना विकला जात आहे. मात्र, किमतीत वाढ जरी झाली असली तरी अनेकजण मातीच्या मडक्याला पसंती देत आहेत.

पूर्वी असणारी अमाप जागा, मडकी बनविण्यासाठी वापरली जाणारी इतर लाकडे, माती, राखाडी, तूस आदी गोष्टी मिळेनाश्या झाल्या असल्या तरी आम्ही आमचा पूर्वापार व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मडकी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल महाग मिळत आहेत. त्यामुळे इच्छा नसूनदेखील आम्हाला ग्राहकाला थोड्या चढ्या भावाने मडकी विकावी लागत आहेत, मात्र तरीदेखील यंदा ग्राहकांचा मडकी विकत घेण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जितेंद्र साखळूणकर,
मडकी विक्रेता
Exit mobile version