। नेरळ । प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन हे धमाल करण्याचे ठिकाण असते, मात्र त्या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील होत असतो. त्यामुळे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक त्रिवेणी संगम आपल्या वाटचालीत ठेवताना विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे यांनी केले.
छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण यांच्या कर्जत शहरातील दहिवली येथे असलेल्या जनता विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि विद्यालयाचे माजी विद्यार्थी, मुंबई सेंट्रल रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक शिरिष कांबळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. तसेच या कार्यक्रमास चित्रपट दिग्दर्शक अलोक कसबे, विठ्ठल मंदिर संस्थानचे उपसेक्रेटरी सुनील नांदुस्कर आणि कर्जत नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रताप गीते, अलका घरत, ज्योती घरत आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेले लेख व कवितांचे ‘हस्तलिखित’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
शाळेचे माजी विद्यार्थी आणि मध्य रेल्वे चे वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर यश संपादन करावे, असा यशाचा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. स्वतःच्या अनुभवातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर ‘लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट’चे समन्वयक महेंद्र धारे यांनी विद्यार्थ्यांशी अतिशय सोप्या आणि हसत-खेळत संवाद साधत प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांकडे केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि कष्ट करण्याची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे, असे मत त्यांनी मांडले.






