| पनवेल | वार्ताहर |
हैद्राबादला न येणाऱ्या पत्नीवर ॲसीड हल्ला केल्याची घटना पनवेल तालुक्यातील खैरणे गावात घडली आहे. 20 जानेवारीला तळोजा येथील खैरणे गावात ही घटना घडली. असून याबाबतचा रितसर गुन्हा दोन दिवसांपूर्वी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. ॲसीड फेकणारा 28 वर्षीय पती अद्याप पोलिसांच्या हाती सापडला नसला तरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पश्चिम बंगाल येथील मूळ निवासी असणारे रमजान गाझी आणि अमिना खातून हे दाम्पत्य खैरणे गावातील प्लॉट नंबर 17 रिझवान कंपनीशेजारी भाड्याने राहत होते. रमजाण हा बांधकामात मोलमजूरी करायचा तर अमिना ही कंपनीत कंत्राटी कामाला जात असे. या दोघांनाही तीन मुले आहेत. मागील काही दिवसांपासून रमजान याने पत्नी अमिनाकडे येथे राहण्याऐवजी हैद्राबादला जेथे बहीण राहते तिकडेच काम पाहू आणि तिकडेच राहण्याचा हट्ट केला. अमिनाचा हैद्राबादला जाण्यास विरोध होता. त्यामुळे काही दिवसांपासून या दोघांमध्ये किरकोळ वाद सुरु झाले. 19 जानेवारीला रात्री असेच भांडण झाले होते. मात्र पहाटे दोन वाजता अमिना व मुले झोपली असताना रमजान हा ॲसीड घेऊन घरी आला. मुले झोपली असताना अमिनाला उठवून त्याने तीच्या चेहऱ्यावर ॲसीड फेकून तिला जखमी केले.
अमिनाने अंगावर पांघरुण घेतल्याने ॲसीड फेकल्यानंतर ते ॲसीड तीच्या चेहऱ्यावर थोडेच उडाले. मात्र तीचा चेहरा 20 टक्यांपेक्षा अधिक भाजला. जखमी अवस्थेमधील अमिनाला शेजारच्यांनी मदत केली. तीला तातडीने औषधाच्या दूकानातून आणलेले मलम लावल्यानंतर तीने येथे न राहण्याचा निर्णय घेतला आणि गाव गाठण्यासाठी थेट रेल्वेस्थानक गाठले. सध्या तीच्यावर कोलकाता येथील एनसीएमसी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या परिसरातील बनियापुकुर या स्थानिक पोलिसांनी संबंधित घटनेचा गुन्हा नोंदविल्यानंतर हा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. 10 फेब्रुवारीला याबाबतचा रितसर गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी नोंदविल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक अर्चना कुदळे यांच्याकडे हे गंभीर प्रकरण सोपविले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे यांनी फरार रमजाणचा शोध सुरु करुन अमिनाच्या अंगावर हल्ला झाला त्यावेळचे त्यांच्या घरातील कपडे या प्रकरणात जप्त केल्याचे लोकसत्ताला सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून रमजाणच्या शोधासाठी स्वतंत्र एक पथक नेमण्यात आले आहे. रमजाणने अतिघातक क्षमतेचे असलेले ॲसीड कसे मिळवले याचा शोध घेत आहेत. रमजान हा पश्चिम बंगालमधील बासंती तालुक्यातील शिमुलतुल्ला गावात राहणारा होता. 2021 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ॲसीड हल्ला झाला होता. त्यानंतरची ही दूसरी घटना आहे.