। मुंबई । प्रतिनिधी ।
मालवणी येथे एका व्यक्तीने पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यानंतर जखमी महिलेला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे.
घटनेतील जखमी महिलेचा प्रेमविवाह झाला होता. पती बेरोजगार असून तो अंमलीपदार्थाचे व्यसन करत असल्याचे महिलेला समजले. तसेच पतीचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे महिलेला समजले होते. त्यामुळे तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या या निर्णयावरून दोघांमध्ये वाद होत होते. रोजच्या भांडणांना कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. पीडित महिला मागील तीन महिन्यांपासून मालाडमध्ये आपल्या आईकडे माहेरी राहत होती. बुधवारी (दि. 25) सकाळी पती महिलेच्या माहेरी आला आणि त्याने पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. या हल्ल्यात महिलेच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. ॲसिड हल्ला झाल्याने घरातील कुटुंबीयांनी मोठ्याने आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिला उपचारासाठी तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.







