उरण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
| चिरनेर | वार्ताहर |
नागाव-म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्यावतीने ओएनजीसीविरोधात परिसरातील प्रकल्पग्रस्त तरुणांना कंत्राटी पद्धतीने चालणाऱ्या कामात नोकऱ्या मिळाव्यात यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यातून नऊही आंदोलनकर्त्यांची उरण न्यायालयाने शुक्रवारी अडीच वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे.
नागाव-म्हातवली परिसरातील बेरोजगार तरुणांना ओएनजीसी प्रकल्पात ठेकेदारी पद्धतीने चालणाऱ्या कामात सामावून घेण्याच्या मागणीसाठी नागाव-म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या वतीने ओएनजीसीविरोधात आंदोलन छेडले होते. आंदोलनानंतर संघटना आणि ओएनजीसी प्रशासन अधिकाऱ्यांच्या बैठकीत आठ बेरोजगार तरुणांना कामावर घेण्याचे मान्यही केले होते. मात्र, ओएनजीसीने दिलेले आश्वासन मुदतीनंतरही पाळले नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागाव-म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या वतीने ओएनजीसी विरोधात आंदोलन छेडले होते. मात्र, कोविड नियम भंग केल्याचा ठपका ठेवून उरण पोलिसांनी सर्वपक्षीय संघटनेच्या एस.के. पुरो, जनार्दन थळी, भारतराज थळी, जितेंद्र ठाकूर, निलेश कोर्लेकर, घनश्याम ठाकूर, विलास पाटील, राजेश पाटील आदी नऊ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 9 ऑगस्ट 2021 रोजी उरण पोलिसांनी उरण न्यायालयात खटलाही दाखल केला होता.
या खटल्याची मागील अडीच वर्षांपासून सुनावणी सुरू होती. या खटल्याचे कामकाज उरण पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. सागर कडू, ॲड. रोहन नाखवा, ॲड. जितेंद्र कात्रने, ॲड.अनुराग ठाकूर या वकील मंडळीने कोणताही आर्थिक मोबदला न घेता नागाव -म्हातवली प्रकल्पग्रस्त संघटेनेच्या आरोपी पदाधिकाऱ्यांची सुनावणीदरम्यान न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. अखेर याप्रकरणी सुनावणीनंतर उरण न्यायालयाने शुक्रवारी अडीच वर्षांनंतर नऊही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती ॲड. सागर कडू यांनी निकालानंतर दिली.
याप्रकरणी उरण न्यायालयात मागील अडीच वर्षांपासून खटला सुरू असताना मानसिक पाठबळ देणारे ग्रामस्थ, मोफत खटला लढविणारे वकील मंडळी या सर्वांचे नागाव-म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेचे नेते काका पाटील यांनी आभार व्यक्त केले. अखेर सत्याचाच विजय झाला असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.