| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड एकदरा येथील ध्रुव लोदी यांच्या मालकीची कस्तुरी आयएनडी-एमएच/3-एमएम 2683 या बोटीतील नाखवा व खलाशी खोल समुद्रात मासेमारीकरिता गेले होते. त्याच ठिकाणी एलईडी मासेमारी करणाऱ्या परप्रांतियांकडून कस्तुरी नौकामधील नाखवा व खलाशांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेमुळे मुरुड शहर, एकदरा, राजपुरी व नांदगावमधील कोळी बांधव एकत्र झाले होते. त्यांनी मुजोरी करणाऱ्या एलईडी मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याची दखल मुरुड पोलीस ठाणे यांनी घेऊन अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ध्रुव गोपाळ लोदी यांच्या तक्रारीनुसार अलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर गावातील मनोज हरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मत्स्य विभागाने बेकायदेशीर एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे.