| पनवेल | वार्ताहर |
दिल्लीमध्ये दरोडा, चेन स्नॅचिंग यासारखे गंभीर गुन्हे करुन फरार असलेल्या आणि पनवेलसह नवी मुंबईत चेन स्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे करुन धुमाकूळ घालणार्या आंतरराज्य टोळीवर नवी मुंबई पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने या टोळीतील चौघांना अटक केली होती. या टोळीने दिल्लीसह नवी मुंबईत संघटतरित्या गुन्हे केल्याचे तपासात आढळून आल्यानंतर या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या टोळीमध्ये सागर जुगेश मेहरा (27), अभय सुनिलवुमार नैन (19), शिखा सागर मेहरा (27) आणि अनुज विरसींग छारी (24) या चौघांचा समावेश आहे. या टोळीने सप्टेंबर महिन्यात एका आठवड्यामध्ये सीबीडी, खारघर, पनवेल, कळंबोली, नेरुळ, वाशी, सानपाडा आणि कामोठे परिसरात चेन स्नॅचींगचे गुन्हे करुन धुमाकूळ घातला होता. त्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयवुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाच्या पथकाने घटनास्थळी भेटी देऊन तसेच तांत्रिक तपास करुन या टोळीतील आरोपींचे छायाचित्र प्राप्त केले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने उलवे परिसरातील 40 ते 45 सोसायट्या आणि गेस्ट हाऊसची तपासणी करुन या चारही आरोपींना जेरबंद केले होते.
या आरोपींच्या चौकशीत त्यांनी नवी मुंबई परिसरात 7 जबरी चोरी, 2 वाहन चोरी तसेच दिल्लीमध्ये 1 गुन्हा असे एकूण 10 गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी या टोळीकडून 1 सोन्याचे मंगळसूत्र, 3 सोन्याच्या चेन, 2 तुटलेल्या सोन्याच्या चेनचे तुकडे असे एकूण 66 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 2 केटीएम मोटारसायकल असा एकूण 7.70 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या टोळीतील आरोपी संघटितपणे गुन्हे करत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच प्राप्त पुरावे याचे अवलोकन करुन गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी या आरोपींविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई होण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.