अकराशे गुन्हेगारांवर कारवाई
| रायगड । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यात (दि.7) मे रोजी लोकसभा निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून गावगुंडांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी सक्रिय गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. गुन्हेगारी वर्तुळाच्या बळावर दहशत पसरविणार्या गुंडाना चांगल्या वर्तणुकीची तंबी दिली जात आहे. अशा गुंडांकडून प्रतिज्ञापत्रावर चांगल्या वर्तनाची हमी लिहून घेतली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 58 आरोपींना तडीपार करण्याबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत. कलम 107, 109 आणि 110 नुसार एक हजार 128 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोन हजार 575 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईबाबतचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिततेचे पालन व्हावे, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सुरुवातीपासूनच सक्रिय गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. एकदा गुन्हेगाराला वर्तन सुधारण्याची संधी दिली जाते. पुन्हा त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेतले जाते. यातील अटी-शर्तीचा भंग केल्यास कारवाई करण्यात येते. हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकार्यांकडून मंजूर होताच थेट कारवाईचा बडगा उगारून आरोपींना जिल्ह्याबाहेर काढले जात आहे. जिल्ह्यात हाभट्टीची दारू गाळणे, अवैध दारू विक्री, जुगार भरवणे, रेती तस्करी, जनावर तस्करी, गुटखा तस्कर अशा सराईत गुन्हेगारांवरही पोलिसांची करडी नजर आहे. या गुन्हेगारांकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. अशा आरोपीच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर थेट हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली जात आहे.
सराईत गुन्हेगारांकडून भविष्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, असे हमीपत्र आरोपीकडून भरून घेण्यात आले आहे. त्यासाठी पोलिस मुख्यालयात संपूर्ण जिल्ह्यातील सराईत यांना बोलावून त्यांना सूचना देण्यात येत आहे . प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये 107 नुसार एक हजार 34 , 109 नुसार 24, 110 नुसार 20, 93 नुसार 27, 55 नुसार 11, 56 नुसार 9, 57 नुसार 3 असा एकूण एक हजार 128 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 107 नुसार दोन हजार 247, 109 नुसार 82, 110 नुसार 102, 93 नुसार 106 , 55 नुसार 5, 56 नुसार 28, 57 नुसार 28 आणि 144(3) नुसार 5 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. रायगड जिल्हा पोलिसांच्या हद्दीतील 11 आरोपी फरार आहेत. तर 663 वॉन्टेड आरोपींना पकडण्याची मोहीम पोलिसांनी सुरु केली आहे असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
आचारसंहिता सुरु झाल्यानंतर आतापर्यंत रायगड पोलिसांनी दारूबंदीचे 175 , अवैध शास्त्र 3 , एनडीपीएस अंतर्गत 1 गुन्हा दाखल करून नऊ लाख 63 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रायगड पोलिसांनी कार्यक्षेत्रातील 58 आरोपींना तडीपार करण्याबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. कुणीही त्याचे उल्लंघन करू नये. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
सोमनाथ घार्गे
पोलीस अधीक्षक रायगड