कामचुकार कर्मचार्‍यांवर कारवाई

मुख्याधिकार्‍यांचा सज्जड इशारा
| नेरळ |प्रतिनिधी |
कर्जतची राज्यात स्वच्छ आणि कचरामुक्त शहर अशी ओळख निर्माण झाली आहे. दरम्यान, स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही आणि कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यावर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना दिला आहे. आरोग्य विभागामधील कर्मचार्‍यांनी आळस झटकून शहरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी प्रेमाने वागावे, असा सल्लाही मुख्याधिकार्‍यांनी दिला आहे.

शहरातील कचरा मुक्त शहर अशी निर्माण झालेली असताना कर्जत शहरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून मागील काही महिन्यात आक्षेप घेण्यात येत आहे. शून्य कचरा डेपो येथील यशस्वी ठरलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हटवण्याची मागणीपर्यंत नागरिक पोहोचले आहेत. त्यामुळे पालिकेचे प्रशासकीय प्रमुख मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी मोर्चा आल्यानंतर अधिक सक्रिय होत कर्जत शहरातील स्वच्छता कायम राहावी आणि कचरामुक्त शहर हे भूषण कायम राहावे यासाठी सर्व कारभार आपल्या हाती घेतला आहे. शहरातील डंपिंग ग्राऊंड, बायो गॅस प्रकल्प आणि शहरातील नागरिकांच्या तक्रारी येत असलेल्या ठिकाणी कचरा प्रश्‍न समजून घेण्यासाठी भेट देण्याचा धडाका सुरू केला आहे. मुख्याधिकारी यांनी आरोग्य विभागामधील निरीक्षकांपासून कर्मचारी या सर्वांची बैठक घेऊन कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. त्यावेळी आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, मुकादम प्रवीण मोरे, नरुद्दिन पठाण तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील कचरा प्रश्‍न बाबत दररोज नागरिकांच्या तक्रारी येत आहेत, त्याचवेळी कर्मचारी हे लोकप्रतिनिधी यांच्या सूचना ऐकून घेत नाही अशी तक्रार आपल्या कानावर आल्या आहेत. त्यामुळे सफाई कर्मचारी यांनी आपल्याला दिलेल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचावे आणि दिलेले काम पूर्ण करण्यात कोणतीही कुचराई ठेवू नये अशी सूचना केली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही आणि नियमानुसार कामे केली नाहीत आणि सतत तक्रारी येत राहिल्यास प्रसंगी नोटिसा दिल्या जातील, असा इशारा मुख्याधिकारी यांनी कर्मचार्‍यांना दिला आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथील कचर्‍याचे प्रश्‍न, दुर्गंधीचे प्रश्‍न आगामी काळात निकाली निघतील, असा सूर निघत आहे.

Exit mobile version