| पनवेल | वार्ताहर |
सिडकोच्या दक्षता विभागाच्या मार्गदर्शनाखाली मागील आठ दिवसांत वेगवेगळ्या पथकांनी 20 डंपरचालकांना डंपर आणि राडारोड्यासह पकडले. मुंबईतून अटल सेतूमार्गे बेकायदा राडारोडा वाहतूक करून उलवे येथे टाकत असताना सिडकोच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. सिडकोच्या मालकीच्या क्षेत्रात बेकायदा राडारोडा टाकणार्यांना पकडण्यासाठी सिडको दक्षता विभागाचे प्रमुख सुरेश मेंगडे यांनी पोलीस व सिडकोचे अभियांत्रिकी आणि सुरक्षा विभागाचे संयुक्त पथक स्थापन केले.
30 नोव्हेंबरला सकाळी मानखुर्द येथील तीन डंपरमध्ये बेकायदा राडारोडा घेऊन अटल सेतूमार्गे गव्हाण गावाजवळ डंपर रिते करत असताना सिडकोच्या पथकाने पकडले. तसेच 8 डिसेंबर रोजी सायंकाळी उलवे येथे सिडकोच्या भरारी पथकातील अधिकार्यांनी मुंबईतून अटल सेतूमार्गे उलवे नोडमधील सेक्टर 12 येथे दाखल झालेल्या 14 वेगवेगळ्या संशयित डंपरवाल्यांची चौकशी केल्यावर या डंपरमधील राडारोडा उलवेत भरावासाठी आणल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी सिडको अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर न्हावाशेवा पोलीस ठाण्यात 14 डंपरचालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच 9 डिसेंबरला सायंकाळी उलवे येथील सेक्टर 18 मधील भूखंड क्रमांक 49 येथे चालकाला मुंबईतून राडारोड्याने भरलेल्या डंपरसह पकडले.