| चिरनेर | प्रतिनिधी |
पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या 12 बोटींवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 1 जून ते 7 जुलैपर्यंत उरण, मुंबई व रायगड समुद्रात ही कारवाई करण्यात आली आहे. 31 जुलै दरम्यान समुद्रत मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असतानाही काही बोटी अवैधरित्या मासेमारीसाठी समुद्रात गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर कारवाई करताना 6 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मासेमारी बंदी काळात समुद्रात मासेमारी सुरू असल्याची माहिती मिळताच मत्स्य व्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी कारवाई करून 6 लाख 50 हजारांचा दंड वसूल केला आहे. देशाच्या सुरक्षेत सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. किमान सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संयुक्त गस्त घालणाऱ्या कोस्टगार्ड, केंद्रीय सुरक्षा दल सागरी पोलिसांनी बंदीकाळातही अवैद्य मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बोटीची तपासणी करून, कठोरपणे कारवाई करण्याची अपेक्षा आहे. मात्र, संयुक्त गस्त पथक याबाबत पुढाकार घेत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. याच प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 12 बोटींवर खटले दाखल करण्यात आले असून, यापैकी चार नौकांचे खटले निकाली काढण्यात आले आहेत.






