अवैध रेती उपसा करणार्‍यांविरुध्द कारवाई

नांदेड पोलिसांची जबरदस्त कामगिरी

। पुणे । प्रतिनिधी ।

अवैध रेती उपसा करणार्‍यांना पोलिसांनी दणका दिला आहे. लोहा तालुक्यातील येळी येथील गोदावरी घाटाच्या परिसरात नांदेड पोलिसांनी जबरदस्त कामगिरी करत एक कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

अवैध रेती उपसा तसेच, जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार कामगिरी सुरू आहे. शनिवारी व रविवारी (दि. 16) सकाळी लोहा तालुक्यातील येळी येथील गोदावरी घाट परिसरातील एका शेतशिवारात तसेच, गोदावरी नदीत अबिनाशकुमार यांच्या संयुक्त पथकाने जबरदस्त कारवाई करत आठ लोखंडी बोटी, सहा इंजन, एक जेसीबी, 25 ब्रास रेती असा एक कोटी 43 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी नवनाथ मोरे यांच्याविरुध्द कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे. नांदेडच्या पोलिसांनी हि कामगिरी केली असून या कामगिरीत पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपपोलीस उपअधीक्षक अश्‍विनी जगताप यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमण्यात आले. त्यानुसार या पथकाने ही कारवाई केली आहे. अवैध रेती उपसा व वाळू घाटावर अवैधरित्या रेतीची साठवणूक याविरोधात गेल्या पंधरा दिवसांपासून जवळपास दहा कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे.

Exit mobile version