दारुची वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई

16 लाखांचा मुद्देमाल केला जप्त


| रत्नागिरी | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल थरारक पाठलाग करून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारमधून पळ काढणाऱ्या संशयित वाहनाचा सिनेस्टाईलने पाठलाग करत विदेशी दारूसह संशयित आरोपींना पकडण्यात आले आहे. या कारवाईत एकूण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून भरारी पथकाने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने सोमवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची छुपी वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोवा राज्य बनावट विदेशी दारुची वाहतूक होणार असची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. तातडीने पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर एस.टी. स्टँड समोरील गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर थांबून वाहनांची तपासणी सुरू केली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेने येणाऱ्या राखाडी रंगाच्या चारचाकी कारला थांबविण्याचा इशारा केला. मात्र पथकाला चुकवून या वाहन चालकाने न थांबता भरधाव वेगाने रिव्हर्स गिअर टाकून तेथून वाहनासह पळ काढला. मात्र भरारी पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करत ही कार अडवण्यात यश मिळवले. वाहनामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे एकूण 4 लाख 65 हजार 120 रुपये किंमतीचे 81 बॉक्स मिळून आले.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी ओंकार इंद्रजीत सावंत आणि सहआरोपी वैभव मनोज कांबळी याच्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय दळवी, निरीक्षक सचिन यादव, निरीक्षक शैलेश कदम, जवान वैभव सोनावले, महिला जवान सुजल घुडे, जवान वाहनचालक मलिक धोत्रे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संजय दळवी, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी भरारी पथक करत आहेत.

Exit mobile version