मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई

। रसायनी । वार्ताहर ।

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यांची चोरीदेखील होत असल्याने जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अपघात आणि गुरांची चोरी यांना आळा बसावा म्हणून खालापूर पोलीस ठाण्यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. गाव, वाड्या, वस्त्या इथे जाऊन जनावरे मालक व शेतकरी यांना आपली जनावरे गोठ्यात बांधण्यास सांगून तशी दवंडी दिली जात आहे.

जनावरे मालक शेतीचे काम संपले की बैल मोकाट सोडतात तर गाई दूध देण्याचे बंद झाल्यावर तिलाही मोकाट सोडतात. यामुळे ही जनावरे मुंबई-पुणे जुन्या रस्त्यावर असणार्‍या हॉटेल येथे येऊन त्यांनी टाकलेले अन्न, भाजीपाला खाण्यासाठी येतात. शेतकरी यांच्या शेतातदेखील गेल्याने तिथेही नुकसान होते. मोकाट जनावरे पाहून त्यांची चोरीदेखील होत आहे. जनावरांचा अपघात घडल्यावर मालक हजर होतात. चोरी झाली की पोलीस आठवतात. अशी अवस्था झाली आहे. खालापूर वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मोकाट जनावरांमुळे अपघात घडल्यास त्यांच्यावरच कारवाई करण्याची दवंडी पिटली आहे. सध्या दवंडीमार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

Exit mobile version