आतापर्यंत 104 वीजचोर पकडले
। पालघर । वार्ताहर ।
पालघर विभागात वीज चोरट्याविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 980 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात 104 ठिकाणी थेट वीजचोरी होत असल्याचे आढळून आले आहे. संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक व दंडाची रक्कम भरण्याबाबत कळवण्यात आले असून प्रतिसाद न देणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे. तर ही मोहिम गुरुवार ( २१ एप्रिल ) पासून अधिक तीव्र करण्यात आली आहे.
मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम सुरु आहे. सातपाटी, माहीम, वडराई तसेच कासा, चारोटी, तलासरी शहर येथे वीजचोरी शोध मोहीम राबवण्यात आली. या मोहिमे मध्ये एकूण 980 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 104 ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे तर 26 ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळून आले. तसेच 22 ठिकाणी झालेल्या वीज वापराची नोंद मीटर वाचनानुसार वीजबिलात झाली नसल्याचे आढळून आले. सातपाटी, माहीम, वडराई येथे 8 लाख 36 हजार रुपये किंमतीची 48 हजार 628 युनिट वीजचोरी पकडण्यात आली. तर कासा, चारोटी, तलासरी येथे 25 लाख 96 हजार रुपयांची 1 लाख 5 हजार 914 युनिट विजेची चोरी उघडकीस आणण्यात आली. सातपाटी, माहीम, वडराई येथील 17 ग्राहकांनी व कासा, चारोटी येथील 14 ग्राहकांनी अनुक्रमे 2 लाख 66 हजार व 1 लाख 47 हजार रुपयांचा भरणा केला आहे.
उपविभागीय अभियंते, सहाय्यक अभियंते, जनमित्र, कर्मचारी, सुरक्षा रक्षक असे सुमारे 125 जणांच्या पथकांनी ही कारवाई केली.