चार दिवसांत लाखो रुपयांचा दंड वसूल
| अलिबाग | प्रतिनिधी |
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई करीत दणका दिला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 941 वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून चार दिवसांत 5 लाख 99 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये वाढते औद्योगिकीकरण व पर्यटनामुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुचाकी वाहनांसह चारचाकी, अवजड वाहनांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. काही बेशिस्त वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवित असतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती अधिक आहे. रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. हेल्मेट नसणे, वाहन वेगात चालविणे, ट्रिपल सीट असणे आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर एक ते चार जानेवारी या कालावधीत कारवाई करीत त्यांच्याकडून 5 लाख 99 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला. त्यात एक जानेवारीला 220 वाहनचालकांकडून 1 लाख 54 हजार 300 रुपये, दोन जानेवारीला 177 वाहनचालकांकडून 1 लाख 3 हजार 200 रुपये, तीन जानेवारीला 375 वाहन चालकांकडून 2 लाख 21 हजार 400 रुपये व चार जानेवारीला 169 वाहन चालकांकडून 1 लाख 20 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.







