। राजापुर । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावांमध्ये सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या मद्याचा बीमोड करण्याची मोहीम राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने सुरू केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ राजापूर तालुक्यातील नाटे येथील बांदकरवाडीतून झाला आहे. या भरारी पथकाने शुक्रवारी (दि.27) टाकलेल्या छाप्यात 1 लाख 97 हजार रुपये किमतीचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले आहे. त्याचबरोबर बेकायदेशीररीत्या मद्य विक्री करणार्या ईश्वरसिंग रामचंद्र बांदकर (46) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसर्या एका कारवाईत राजापुरातील हातिवले-जैतापूर मार्गावर गोवा मद्याची वाहतूक करणार्या कारमध्ये 1 लाख 58 हजार किमतीच्या मद्यासह 1 लाख 40 हजार रुपये किमतीची कारही जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी रत्नागिरी जिल्हा भरारी पथकासह सर्व युनिटना कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यानुसार भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर पथकातील सहकारी दुय्यम निरीक्षक जी. सी. जाधव, एस. बी. यादव, जवान मानस पवार, वैभव सोनावले, व्ही. के. भोसले, एस. टिकार, एन. जे. तुपे यांनी कारवाईला प्रारंभ केला आहे.