काळ्या काचा लावणाऱ्यांना दणका

साडेचार लाख रुपयांचा दंड वसूल

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलीस कारवाई करीत असताना, गाडीला काळ्या काचा लावणाऱ्यांनादेखील दणका देण्यात आला आहे. आतापर्यंत 473 चालकांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून चार लाख 39 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अभिजीत भुजबळ यांनी जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे.”

चारचाकी गाडीला काळ्या काचा लावणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे याविरोधात कारवाई करण्यात येत आहे. तरीदेखील जिल्ह्यात काही महाभाग बिनधास्तपणे गाडीला काळ्या काचा लावून वाहन चालवित असल्याचे अभिजीत भुजबळ यांच्या निदर्शनास आले. अखेर त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या बंदोबस्ताच्या दरम्यान काळ्या काचा लावणाऱ्या वाहन चालकांसह मालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. त्यानुसार या महिन्यात त्यांनी 179 जणांविरोधात कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाख 52 हजार रुपयांचा हंड वसूल केला. तसेच गाडीला असलेल्या काळ्या काचा काढूनदेखील घेतल्या. आतापर्यंत 473 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. चार लाख 39 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version