| रोहा | प्रतिनिधी |
रोहे अष्टमी भागात गेली अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. काही नळधारक बेकायदेशीरपणे विजेचा पंपाचा वापर करुन त्याद्वारे पाणी घेत असल्यामुळे इतर लगतच्या नळधारकांना पुरेसा पाणी मिळत नाही.
वीज पंपाचा वापर करुन गैर मार्गाने पाणी खेचणाऱ्या नळधारकांवर कायदेशीर कारवाई करुन आम्हला देखील आमच्या हक्काचे मिळावे, अशी मागणी जनतेतून होत असताना रोहा नगर पालिकेच्या पथकाने भल्या पहाटे नागरिक झोपेत असताना चक्क कडक पोलीस बंदोबस्तमध्ये कारवाईला सुरुवात केली. या धाडसत्रात 14 ठिकाणी लावण्यात आलेले बेकायदेशीर विजेचे पंप जप्त करण्यात आले. मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाचे अभियंता ओंकार भुरण, आरोग्य निरीक्षक मनोज पुळेकर यांच्या नेतृवाखाली पोलीस अधिकारी व नगरपालिका कर्मचारी यांच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
रोहा नगर पालिकेकडून पुरवठा करण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नळाला थेट विजेचा पंप लावून बेकायदेशीररित्या पाणी घेण्याचे प्रकार सरार्सपणे घडत आहे. या नियमबाह्य आणि अनधिकृत पाणी चोरीमुळे रोहे अष्टमी शहरातील त्या-त्या भागातील पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम होत असून लगतच्या नळधारकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांत पाण्यासाठी बोंबाबोंब होत आहे.
विजेचा पंपाचा वापर होत असल्याने सामान्य नळधारकांना पुरेसा पाण्यापासून वंचित राहावे लागते. नियमबाह्य विजेचा पंपाचा वापर करणे बंद न केल्यास त्या ग्राहकांवर नगर परिषद प्रशासनाकडून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा काही दिवसापूर्वी शहरातील प्रमुख चौकात होर्डिंग बॅनर्स लावून, पत्रकद्वारे तसेच रिक्षातून दवंडीद्वारे रोहा नगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आला होता. विजेचा मोटरचा वापर करुन नये, असे वारंवार आवाहन करण्यात आले. मात्र तरीदेखील काही ठिकाणी विजेचा पंपाचा खुले आमपणे वापर होत असल्याने मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांच्या आदेशानुसार शनिवारी पहाटे पोलीस बंदोबस्तमध्ये कारवाई सुरु करण्यात आली. अष्टमी प्र.क्र.1 व प्र.क्र.2मध्ये या धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली. या भागातील 14 जणांविरोधात कारवाई करुन त्यांच्याकडील विजेचे पंप जप्त करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बेकायदेशीर विजेचे पंप वापरून नियमबाह्य पाणी घेण्याचे प्रकार थांबविण्यासाठी न.प. प्रशासनाकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. थेट नळ संयोजनाला वीज पंप जोडून पाणी घेत असल्याचे आढळून आल्यास संबधित वीज पंप तात्काळ जप्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. जप्त केल्यानंतरही पुन्हा विजेचा पंप जोडून पाणी घेत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर पंप जप्त करुन 5 हजार रु. दांडात्मक कारवाई व संबधित व्यक्ति विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी नगर पालिकेला सहकार्य करावे.
अजयकुमार एडके,
मुख्यधिकारी






