2 लाख 90 हजारांचा दंड वसुल
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी महापालिकेकडून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा राबवण्यात येत आहेत. दिवाळीत केलेल्या कारवाईतून महापालिकेने तब्बल 1 लाख 65 हजार इतका दंड वसूल केला आहे. ऑक्टोबर महिन्यातही 264 किलो प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात येऊन 58 व्यावसायिकांकडून दोन लाख 90 हजारांचा दंड वसुली करण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन, या कालावधीत प्लास्टिक पिशव्यांना व प्रतिबंधित प्लास्टिकला अटकाव करण्याच्या दृष्टीने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. यामध्ये 183 किलो प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त केला तर 1 लाख 65 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
बेलापूर विभागात 12 व्यावसायिकांवर कारवाई करीत 50 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून 60 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. नेरूळ विभागात एका व्यावसायिकाकडून एक किलो प्लास्टिक जप्त करून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. वाशी विभागात सात व्यावसायिकांकडून नऊ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती 40 हजारांचा दंड वसूल करण्यात आली. तुर्भे विभागात दोन व्यावसायिकांवर कारवाई करीत 10 हजार दंडवसुली व 5 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले. कोपरखैरणे विभागात 15 हजार दंडात्मक रक्कम वसुलीसोबतच तीन व्यावसायिकांकडून 15 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
व्यावसायिकांवर कारवाई ऐरोलीत अर्धा किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्या जप्त करून पाच हजारांचा दंड आकारण्यात आला. परिमंडळ एकच्या भरारी पथकाने चार किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करून दहा हजारांचा वसूल केली. तसेच परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने 109 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले व 20 हजार दंडात्मक रक्कम 4 व्यावसायिकांकडून वसूल केली. अशाप्रकारे एकूण 32 व्यावसायिकांवर कारवाई करीत 183 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती व 1 लाख 65 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.