खारघरमध्ये वाहनदुरुस्ती व फळविक्रेत्यांवर कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

मोटार वाहनदुरुस्ती करणार्‍या 12 जणांवर फौजदारी कारवाई केल्यानंतर खारघर पोलिसांनी त्यांचा मोर्चा फळविक्रेत्यांकडे वळविला आहे. खारघर सेक्टर 20 व 21 येथील तिघांवर भारतीय दंड संहिता 283 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.

निळकंठ स्वीट या दुकानासमोरून ओवे गावाकडे जाणार्‍या मार्गावरील विक्रेते सुलतान शेख व तौकीर शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच सेक्टर 20 येथील ग्रीन हेरीटेज इमारतीसमोरील मार्गावर नारळपाणी विक्रेता सरफराज शेख याच्यावर पोलिसांनी फौजदारी कारवाई केली.

खारघरमध्ये रस्त्याकडेला व रस्त्याच्या अगदी मधोमध दोनशेहून अधिक विक्रेते बेकायदा व्यवसाय करतात. पालिकेने कारवाई करुनही फेरीवाले रस्ता सोडत नसल्याने शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बेकायदा व्यवसाय करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाईचे सत्र खारघर पोलिसांनी सुरू केले आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना विचारले असता त्यांनी अनेकदा पोलिसांनी तोंडी सांगूनही रस्ता अडवून व्यवसाय केल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने ही कारवाई करणे भाग पडल्याचे सांगितले.

Exit mobile version