कोव्हिड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पनवेल महसुलची दंडात्मक कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।
सध्या नाताळ सण आणि न्यू इयर सेलिब्रेशनचे तरुणाईसह सर्वांनाच वेध लागले आहेत. परंतु कोरोनाचा नवा व्हेरिएंट असणार्‍या ओमीक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून नवी नियमावलीनुसार जाहीर करण्यात आली आहे. या दिवसांत सेलिब्रेशनसाठी गर्दी होऊन ओमीक्रॉनचा प्रसार वाढण्याची भीती असल्याने शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महसूल प्रशासनाकडून पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून नियमांचे उल्लंघन करणार्‍या न्यू इयर पार्ट्या, मास्कचा वापर न करणारे तसेच कोरोनाच्या नियमांचा भंग करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.


पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील एकूण 71 ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये 71 पथके तैनात करण्यात आली आहे आहेत. या अनुषंगाने कोविड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर महसुलच्या पथकांकडून कारवाईस सुरुवात झाली असून दोन दिवसांत एकूण 16 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. याद्वारे सोमवारी (दि.27 डिसेंबर) 38 रेस्टोरंट्स, 20 दुकाने, 25 सार्वजनिक स्थळे अशा एकूण 83 ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली. यात कोव्हिड नियमांचे उल्लंघन करणारे 2 रेस्टोरंट्स, 5 दुकाने, 10 सार्वजनिक ठिकाणे अशा एकूण 17 ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 8500 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी 17 जण विनामास्क फिरताना आढळून आले होते. नुकतेच पनवेल परिसरात ओमीक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. ओमीक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या नव्या नियमावलीनुसार कोव्हिड अनुरूप वर्तन न करणारे नागरिक आणि आस्थापनांवर अशाच प्रकारे दंडात्मक कारवाई सुरू राहील. त्यामुळे नागरिकांनीही खबरदारी बाळगावी आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. – तहसीलदार विजय तळेकर, पनवेल

Exit mobile version