स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय
| नेरळ | प्रतिनिधी |
शहापूर-मुरबाड-कर्जत हा राष्ट्रीय महामार्ग कशेळे गावातून जातो. त्याचवेळी उरण-पनवेल- नेरळ- भीमाशंकर हा राज्यमार्ग देखील कशेळे गावातून जातो. त्याचवेळी कशेळे खांडस या प्रमुख जिल्हा मार्ग देखील गावातून जात असून, या सर्व प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे करून बांधकामे झाली आहेत. ही सर्व बांधकामे तोडण्यास सुरुवात झाली असून त्या निमित्ताने स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
कशेळे गावातून जाणाऱ्या कशेळे-मुरबाड, कशेळे-कर्जत, कशेळे-नेरळ, कशेळे-कोठीबे आणि कशेळे-खांडस या सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. विक्रेते व दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे बस, जड वाहने तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हि सर्व अतिक्रमणे काढण्यात यावी यासाठी कशेळे व्यापारी संघटना अनेक वर्षे मागणी करीत आहे. शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाने हि सर्व अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली असून कशेळे गावात या सर्व प्रमुख रस्त्यावर सुरु झाली आहे. पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, कशेळे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारवाई दरम्यान अतिक्रमण केलेल्या रस्त्याच्या भागांना रंगाने स्पष्टपणे चिन्हांकित करण्यात आले असून संबंधित विक्रेते व दुकानदारांना दोन दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
