जेएसडब्ल्यू व्यवस्थापनालाही नोटीस
| नागोठणे | वार्ताहर |
डोलवी पेण येथील जेएसडब्ल्यू कंपनी ते जेएसडब्ल्यू कंपनीच्या साळाव येथील प्लांटमध्ये कच्चा लोखंड असलेल्या खडीची (गोटी) डंपरमधून नागोठणे, भिसे खिंड, रोहामार्गे साळाव अशी वाहतूक करण्यात येत आहे. साळाव येथे प्रक्रिया करुन ही खडी डोलवी येथे आणण्यात येत आहे. मात्र, डंपर व ट्रक चालक नियमबाह्य वाहतूक करीत असल्याचे कृषीवलने निदर्शनास आणताच पेण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसारच तपासणीदरम्यान आढळलेल्या ताडपत्रीशिवाय वाहतूक करणार्या एका वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी दिली.
उपलब्ध माहितीनुसार अलिबागमार्गे रेवदंडा ते साळावदरम्यान असलेला सागरी पूल दुरुस्तीसाठी जड वाहनांना बंद करण्यात आला असल्याने नागोठणे, रोहामार्गे साळाव या मार्गाचा उपयोग तात्पुरत्या कालावधीसाठी सदर वाहनांकडून करण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी नियम धाब्यवर बसवून हे वाहनचालक माल वाहतूक करीत असल्याच्या बातम्या व तक्रारी पेणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांकडे करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांच्या आदेशानुसार रविवार, (दि.10) मे रोजी इंडो एनर्जी जेट्टी-नागोठणे-रोहा-साळाव या मार्गाने जेएसडब्ल्यू कंपनीसाठी कच्च्या लोखंडी गोळ्यांची वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान बहुतेक गाड्या ताडपत्र्यांचा वापर करत असल्याचे दिसून आले असले तरी इतर बाबतीतही नियम मोडणार्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असेही महेश देवकाते यांनी स्पष्ट केले.
तसेच जेएसडब्ल्यू कंपनी, साळाव येथील व्यवस्थापनास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काढण्यात आलेली नोटीस बजावण्यात आली आहे. तेथील कंपनीच्या संबंधित अधिकार्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यांनी यावर ते करीत असलेल्या उपाययोजना व प्रयत्न सांगितले आहेत. तसेच संबंधित वाहतूकदारांशी यासंदर्भात समज देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही महेश देवकाते यांनी दिली.