अवैध मद्यसाठाप्रकरणी कारवाई

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत गेल्या 7 महिन्यांत जिल्ह्यात 464 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईत 59 वाहनांसह 7 कोटी 75 लाख 61 हजार 715 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एकूण 332 संशयितांना अटक करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विभागाचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारू वाहतूक व विक्रीवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे विविध 20 पदे रिक्त असूनही कमी मनुष्यबळाच्या जोरावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने भरीव कामगिरी केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने एप्रिल ते ऑक्टोबर या गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये देशी विदेशी मद्य, बियर, वाइन तसेच इतर मद्य कारवाईमध्ये जप्त करण्यात आले. जिल्ह्यात 132 परमिट रूम, 117 बीअर शॉपी, 44 देशी तर 1 वाइन शॉप कार्यरत आहेत.

Exit mobile version