। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्रात प्रजनन, मत्स्यपालन आणि वाहतूक व विक्रीवर बंदी असलेल्या थाई मागूर माशांचे संवर्धन करणार्या खालापूर तालुक्यातील महड येथील इसमावर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य आणि पर्यावरणाला अपायकारक असणार्या या माशाचे पालन आणि विक्री रायगड जिल्ह्यात देखील होत असल्याचा प्रकार या कारवाईमुळे उघडकीस आला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने अधिक सतर्क होत असे व्यवसाय उधळण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी दि. 22 जानेवारी 2019 रोजीच्या आदेशानुसार अवैध थाई मागूर माशांच्या प्रजनन, मत्स्यपालन, वाहतुक व विक्री करण्यावर बंदी घातली असून, प्रतिबंधित मागूर माशांचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार 4 जानेवारी 2022 रोजी प्रादेशिक उपआयुक्त, मत्स्यव्यवसाय महेश देवरे रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांच्यासह सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अजया भाटकर, चेतन निवळकर व परवाना अधिकारी रश्मी आंबुलकर यांनी खालापूर तालुक्यातील महड येथे अवैध थाई मागूर माशांचे संवर्धन करणार्या इसमावर खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्या इसमावर भादंवि कलम 188, 268, 273 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महड येथील या इसमाच्या तळ्यातील बेकायदेशीर थाई मागूरचा साठा जप्त करून नष्ट करण्याची कारवाई विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांनी दिली.
- विदेशी थाई मागूरवर बंदी का आहे
- नैसर्गिक परिसंस्थांना हानी
- हा मासा जलीय पर्यावरणासाठी हानिकारक ठरतो, त्यामुळे मागूर मासा इतर मासे, तसेच जलीय परिसंस्थांमधील इतर घटकांना हानिकारक ठरतो, तसेच इतर प्रजाती लुप्त होण्यास कारणीभूत समजला जातो. थाई मागूर प्रामुख्याने इतर मासे, पाण्याजवळ येणारे लहान पक्षी, प्राण्याचे सडलेले मांस, पाण्याच्या तळाशी साचलेला जैविक कचरा इत्यादी न मिळाल्यास अजैविक कचरा इत्यादीसुद्धा खाद्य म्हणून स्वीकार करतो.
- मानवी आरोग्यासाठी हानिकारक
- हा मासा अनेकदा अजैविक कचरासुद्धा खाद्य म्हणून सेवन करतो. माशाच्या मांसात अनेकदा जड धातू जसे झिंक, कॅडमिअम आणि आर्सेनिक इत्यादीचे संक्रमणसुद्धा आढळून आलेले आहे. हे धातू मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत.
देशी मागूर आणि विदेशी थाई मागूरमधील फरक
देशी मागूर आणि विदेशी थाई मागूर हे दोन्ही मासे दिसायला सारखे दिसतात व ग्राहकांना यामध्ये सहजरीत्या फरक शोधणे कठीण जाते. या दोन माशांतील प्रमुख फरक पुढीलप्रमाणे आहेत.
देशी मागूर
तांबूस काळ्या रंगाचा हा मासा आकाराने लहान असतो व संपूर्ण जीवनकाळात या माशाचे कमाल वजन हे फक्त 1 किलोग्राम इतके वाढू शकते; पण बाजारात 250-300 ग्रॅम वजनापर्यंतच्या माशाला चांगली मागणी आहे.
या माशाच्या कवटीवर इंग्रजी यू (ण) आकाराचे चिन्ह असते.
या माशाची वाढ ही थाई मागूरपेक्षा मंद असते.
हा मासा प्रतिकिलो 350-500 रुपये दराने विकला जातो.
विदेशी थाई मागूर
थाई मागूर जातीचा मासा हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकतो. तसेच, घाण पाण्यात अथवा कमी पाण्यात अगदी चिखलातही हा मासा वाढतो.
याचे कमाल वजन हे 30 किलोपर्यंतसुद्धा जाऊ शकते.
या माशाच्या कवटीवर इंग्रजी त आकाराचे चिन्ह असते.
मार्केटमध्ये टबमध्ये कमी पाण्यात जिवंत मासा म्हणून विकला जातो. या माशाची किंमत 90-130 रुपये प्रतिकिलोपर्यंत असते. विस्तृत तोंडामुळे हा मासा तुलनेने मोठी शिकार संपूर्ण गिळण्यास सक्षम आहे.
हा मासा साधारणपणे 3-4 फूट लांबीपर्यंत वाढतो, तसेच हा मासा हवेतून प्राणवायू घेऊन श्वसन करत असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही या माशाची वाढ होते.
या माशांचे संवर्धन करताना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळण्यासाठी या माशाला कोंबड्यांची घाण, खाण्यायोग्य नसलेले कोंबडीचे मांस, तसेच कत्तलखान्यातील कुजलेले शेळ्या, गाई, म्हशी यांचे मांस खाद्य म्हणून वापरले जाते, यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचे आढळून येते.