सीमा शुल्क विभागाने ठोठावला लाखांचा दंड
| चिरनेर | प्रतिनिधी |
कंटेनर यार्डमध्ये साठवणूक करण्यात आलेल्या धोकादायक रसायनांची हाताळणी करण्यात आणि सुरक्षेतत ढिलाई दाखविल्या प्रकरणी उरण येथील वैष्णो लॉजिस्टिक्स यार्ड व्यवस्थापनाला येथील जेएनसीएच्या सीमा शुल्क विभागाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी सीमा शुल्क विभागाच्या विविध कलमाखाली साडेचार लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असून, कस्टम्स कार्गो सर्व्हिस प्रोव्हायडरचा परवानाही 15 सप्टेंबर पर्यंत निलंबित करण्यात आला आहे. 15 दिवसांपुर्वीच डीपी वर्ल्ड मल्टीमोडल लॉजिस्टिक्स प्रा. लि.कंपनीचा कार्गो कंटेनर आयात-निर्यात व्यवसाय परवाना जेएनपीए सीमा शुल्क विभागाने धडक कारवाई कारवाई करीत निलंबित केला आहे. सीमाशुल्क विभागाच्या कारवाईमुळे मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उरणमधील शेकडो सीएफएस मालकांचे धाबे दणाणले आहेत.
चिर्ले-उरण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वैष्णो लॉजिस्टिक्स यार्डमधुन कंटेनर मालाची हाताळणी आणि धोकादायक रसायनांची साठवणूक केली जात आहे. या यार्डमध्ये साठवणूक करुन ठेवण्यात आलेल्या धोकादायक रसायनांच्या कंटेनरला 15 जानेवारी 2024 रोजी भीषण आग लागली होती. या भीषण आगीत साठवून ठेवण्यात आलेल्या कंटेनरमधील 69,000 किलो घातक रसायन जळून नष्ट झाले होते. त्यामुळे जिवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. याप्रकरणी जेएनपीएच्या सीमा शुल्क विभागाकडून चौकशी केली जात होती. चौकशीअंती आपातकालीन यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित नव्हती. धोकादायक रसायनांची साठवणूक करताना योग्य प्रकारे दक्षता घेतली नव्हती. तसेच, चौकशीअंती सुरक्षा यंत्रणांच्याही अनेक त्रुटी उजागर झाल्या आहेत. याप्रकरणी निष्काळजी व हलगर्जीपणाचा ठपका ठेवून जेएनसीएच्या कस्टम्स आयुक्त (एनएस-जनरल) बी. सुमिदा देवी यांनी विविध नियमांखाली वैष्णो लॉजिस्टिक्स यार्डला साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, 15 सप्टेंबरपर्यंत कस्टम्स कार्गो सर्व्हिस प्रोव्हायडरचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे. याआधीही 15 दिवसांपुर्वीच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खोपटा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या डीपी वर्ल्ड मल्टीमोडल लॉजिस्टिक्स प्रा. लि.कंपनीचा आयात निर्यात परवानाही निलंबित करण्यात आल्याची कारवाई सीमा शुल्क विभागाकडून करण्यात आली आहे.







