वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई

भंगार वाहने उचलण्याची मोहीम सुरु


| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबईतील विविध मार्गांवर बेवारस, धूळ खात पडलेली भंगारातील वाहने रस्ता अडवून ठाण मांडून बसलेली आहेत. यामध्ये शहरा बाहेरील अनेक वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला असून गेल्या काही दिवसात सहा चोरीच्या दुचाकींचा शोध लावण्यात यश आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या बेवारस स्थितीत अथवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

नवी मुंबई पोलीस मुख्यालय क्षेत्रातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर करण्याच्या अनुषंगाने रस्त्यालगत उभी केलेली तसेच शहराच्या सौंदर्यात बाधा आणणारी बेवारस आणि भंगार स्थितीतील वाहने उचलण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. याच अनुषंगाने एक पथक तयार केले असून या पथकात एक अधिकारी, वाहतूक विभागाचे अंमलदार, गुन्हे शाखेचे अधिकारी व मोटर व्हेईकल सेलचे अधिकारी व कर्मचारी नवी मुंबई परिसरातील बेवारस वाहनांच्या मालकाला शोधणे, वाहन चोरीचे आहे किंवा वाहनावर काही गुन्ह्याची नोंद असल्याची त्याची तपासणी करणार आहे. तसेच या वाहनांचा मालक सापडला नाहीतर न्यायालयाच्या आदेशाने त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.

अनोळखी वाहनांचा समावेश
स्टेशन परिसरातील रस्ते, उद्यान, मैदाने याच्या आजूबाजूला असलेला रस्ता तसेच पदपथावर बिनधास्त वाहने उभी केली जात आहेत. यातील अनेक गाड्या या महिन्यांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्याच रिक्षा, दुचाकी, टेम्पो, कार अशा वाहनांचा यात समावेश असून अनेक वाहने धूळखात तसेच गंजून पडली आहेत. तर काही वाहनांच्या नंबरप्लेट या परराज्यातील, शहरातील आहेत. त्यामुळे या वाहनांविषयी कोणालाही काहीच माहिती नसल्याने कारवाई करण्यात विविध अडचणी येत आहेत.

नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत असलेली वाहने हटवण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. लवकरच वाहतूक विभाग या वाहनांवर कारवाई करणार आहे. त्यामुळे वाहन मालकांनी अशी वाहने तात्काळ हटवावीत, अन्यथा वाहतूक पोलिसांमार्फत अशी वाहने उचलून नेण्यात येतील.

अमित काळे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे शाखा
Exit mobile version