विकासनामा वेब पोर्टलवर कारवाई करा; कर्जत तालुका शेकापची मागणी

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर

। रायगड । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत कोणत्याही कागदपत्रांची खातरजमा न करता विकासनामा या वेब पोर्टल प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याबाबत कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाकडून नेरळ पोलीस ठाणे आणि कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदन देऊन दंडात्मक करवाई करण्याची मागणी केली आहे.

विकासनामा या वेब पोर्टलवर शेतकरी कामगार पक्षाची बदनामी करणारे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानिमित्ताने कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस राम राणे यांनी कर्जत तालुका कार्यकारिणीची बैठक घेतली होती आणि त्यानंतर नेरळ पोलीस ठाणे आणि कर्जत पोलीस उपअधिकारी कार्यालयात जाऊन विकासनामा प्लॅटफॉर्मवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्ष उपाध्यक्ष रविंद्र भोईर, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आणि कर्जत तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती प्रकाश फराट, संचालक रवींद्र झांजे, पक्षाचे कार्यकर्ते नरेंद्र हजारे, बादशहा पाटील, दत्ता राणे, शंकर घोडविंदे, शेकाप युवक तालुका अध्यक्ष आणि अलिबाग बँकेचे संचालक अनिल जोशी, शेकाप अनुसूचित जमाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बबन भालेराव, विभाग चिटणीस पांडुरंग बदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्षापैकी एक पक्ष असून महाराष्ट्र व देशाचे सामाजिक व राजकीय जडण घडणीमध्ये प्रमुख भूमिका बजावलेला पक्ष आहे. पुरोगामी चळवळीचे माध्यमातून समाजातील तळागाळातील जनतेच्या व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आजपर्यंत अनेक चळवळींच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आवाज उठवला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा सामाजिक चळवळीचा वारसा असलेला पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्ष हा समाजातील तळागाळातील लोकांमधून विकासाचे ध्येय घेवून अनेक युवा व जाणकार कार्यकर्ते असलेला आणि विशेष म्हणजे जनाधार असलेला पक्ष आहे. तथाकथित पत्रकारीता व्यवसायातील व्यक्तीने त्याचा विकासनामा या नावाने डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बातम्या बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध करत असल्याचे पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे नेते यांच्या विषयी बदनामीकारक व वादग्रस्त बातमी प्रसिद्ध केलेली आहे. बातमीमध्ये तथाकथित पत्रकार यांनी पक्षाच्या लोकसभा निवडणुकीमधील तसेच विधान परिषद निवडणुकीमध्ये ध्येयधोरण विषयी व पक्षाच्या भूमिकेविषयी कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय बदनामीकारक विधाने केलेली आहेत. त्यांच्या सदरच्या विधानामुळे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बदनामी झालेली आहे व जनमानसात पक्षाची प्रतिमा मलिन झालेली आहे.

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचे काम केले जाते. मात्र विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या बातमी पत्रातील विधानामुळे शेतकरी कामगार पक्ष व आमचे जिल्ह्यातील नेते यांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत. अशा बेसुमार पत्रकारितेला लगाम बसण्याकरीता त्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी कामगार पक्ष जनआंदोलन उभे करेल, असा इशारा कर्जत तालुका शेकापने दिला आहे.

Exit mobile version