बनावट मद्य वाहतुकीवर कारवाई

| नवीन पनवेल | प्रतिनिधी।

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभाग यांनी नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बनावट मद्य वाहतुकीवर कारवाई केली. या प्रकरणी पडघे येथील जयवंत दत्तू भोईर (38) याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांला अटक करण्यात आली. रविवारी (दि.14) तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवम अपार्टमेंट, सेक्टर 16, घोटगाव रोडवर तळोजा या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला. एका चार चाकी वाहनांमध्ये बनावट विदेशी मद्याच्या 144 बाटल्या आणि एक चार चाकी वाहन असा एकूण 2 लाख 58 हजार 120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी जयवंत भोईर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सदरचे मद्य जवळच असलेल्या फ्लॅटमधून आणल्याचे सांगितले. त्या ठिकाणी छापा टाकून बनावट विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या 250 बाटल्या असा एकूण 80 हजार 270 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही ठिकाणी मिळून 3 लाख 38 हजार 390 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जयवंत भोईर याला अटक करण्यात आली. ही कारवाई पनवेल ग्रामीण विभाग अनिल बिराजदार दुय्यम निरीक्षक, अजित बडदे, सुरेश झगडे, गैनीनाथ पालवे, सचिन कदम, ऋषिकेश भोगे यांनी पार पाडली.

Exit mobile version