जनतेची लूट करणे पडले महागात
| अलिबाग | प्रतिनिधी |
सावकारीचा गोरखधंदा चालविणाऱ्या पेण तालुक्यातील चिंचपाडा येथील दोन सावकारांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दणका दिला आहे. जनतेची पिळवणूक करून त्यांची आर्थिक लूट करणे त्यांना महागात पडले आहे. या दोघांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून वचनचिठ्ठ्या, धनादेश व इतर संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुर्यकांत पाटील आणि भरत पाटील असे दोन सावकारांची नावे आहेत. या दोघांनी मिळून पेणमध्ये परवानाधारक सावकारीचा धंदा चालू केला होता. परंतु, त्यांच्याकडून आर्थिक लूट केली जात होती. त्यामुळे त्यांच्या या सावकारी जाचाला कंटाळलेल्या काही त्रस्त नागरिकांनी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची भेट घेतली. त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडून लेखी तक्रार दिली. या तक्रारीची गंभीर दखल घेत आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. सहकार विभागातील अधिकाऱ्यांसह या पोलीस दलाने संयुक्त कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यांनी एकाच वेळी त्यांच्या घरी, हॉटेलमध्ये व इतर ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी कर्जदारांकडून लिहून घेतलेल्या वचन चिठ्ठ्या, धनादेश व मिळालेली इतर कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, प्रसन्ना जोशी, पोलीस हवालदार मोरेश्वर ओंबळे, महिला पोलीस हवालदार अस्मिता म्हात्रे, रेखा म्हात्रे, झुलिता भोईर, पोलीस हवालदार सचिन वावेकर, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, बाबासो पिंगळे, अक्षय जगताप व ओमकांर सोंडकर यांनी मेहनत घेतली.







