। पनवेल । प्रतिनिधी ।
राज्य उत्पादन शुल्क पनवेल शहर विभाग यांनी बनावट मद्य विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 78 हजार रुपयांचा मद्य साठा जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क पनवेल शहर विभाग, निरीक्षक यांना 16 जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात दोन व्यक्ती बनावट विदेशी मद्यची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला. यावेळी खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात दोन संशयित व्यक्ती प्रवासी बॅगा खांद्यावर घेऊन जात असताना त्यांची तपासणी केली या बॅगमध्ये बनावट विदेशी मद्य सापडून आले. ते मद्य वसई वरून आणले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार वसई येथील आरोपीच्या घरी छापा टाकला असता बनावट मद्यने बॉटलिंग केलेल्या बाटल्या, गोवा राज्य निर्मित आणि विक्रीसाठी आणलेल्या विदेशी मद्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, दादरा नगर हवेली निर्मित आणि विक्रीसाठी असणाऱ्या विदेशी मद्याच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या आणि इतर बाटल्या जप्त करण्यात आल्या. असा एकूण 78 हजार 188 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.







