1 हजार 780 नळजोडण्या खंडित
। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणीपुरवठा विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 1 हजार 780 नळ जोडण्या खंडित केल्या असून 152 मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच, एकूण 50 पंप रुम सील करण्यात आले असून थकबाकी वसुलीसाठी 3 हजार 354 थकबाकीदार ग्राहकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे 59.43 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे 224 कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही 148 कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, आयुक्तस्तरावर या वसुलीबाबत सातत्याने आढावाही घेतला जात आहे.
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.