नियम मोडणार्‍या 265 रिक्षांवर कारवाईचा बडगा

वाहतूक विभागाची विशेष कारवाई मोहीम, नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 265 रिक्षा वाहनांवर वाहतूक विभागाच्यावतीने कारवाया करण्यात आल्या. नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या सूचनेनुसार पनवेल शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विना गणवेश, विना बॅच, पुढील सीटवर प्रवासी बसवणे याप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाया करण्यात आल्या. एका बैठकीत कारवाईची पूर्व सूचना देऊनही रिक्षाचालकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने 265 रिक्षाचालकांना वाहतूक विभागाच्या कारवाईस सामोरे जावे लागले.


काही दिवसांपूर्वी पनवेल परिसरातील रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड व वाहतूक शाखेच्यावतीने घेण्यात आली होती. यावेळी सर्व रिक्षा चालकांना आरटीओ दंडात भरमसाठ वाढ झाल्याची माहिती देऊन प्रवाशांशी सौजन्याने वागा, मीटरप्रमाणे भाडे घ्या, रिक्षा पासिंग, इन्शुरन्स, पीयूसी, गणवेश, लायसन्स यासह बॅच नेहमी सहज दिसेल असे लावावे आणि सर्व रिक्षा चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे अशा विविध सूचना देण्यात आल्या होत्या. तरीदेखील काही रिक्षाचालक अजूनही नियमांचे उल्लंघन करत असल्याचे वाहतूक विभागाच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने एकूण 265 रिक्षांना वाहतूक विभागाच्या कारवायांना सामोरे जावे लागले.
रिक्षाचालकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे. गाडीचे पेपर वेळेत पूर्ण करून घ्यावेत. व्यसन करून कधीही वाहन चालवू नका. आरटीओच्या दंडाच्या रक्कमेत देखील भरमसाठ वाढ झालेली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना भूर्दंड बसू नये याउद्देशाने सर्व रिक्षाचालकांना आवाहन करण्यात येते. – संजय नाळे, पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक

Exit mobile version