गोदरेज कंपनीवर होणार कारवाई?

जिल्हाधिकारी यांची माहिती; अलिबागमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

गुरचरण जागेत अतिक्रमण करण्याबरोबरच आदिवासी समाजाच्या जमिनी हडप केल्याचा ठपका ठेवत खालापूरमधील गोदरेज कंपनीवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. अलिबागमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गोदरेज कंपनीमध्ये अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गुरचण जमीन कोणत्याही कारणासाठी देण्यात येऊ नये, असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. तरीदेखील गोदरेज कंपनीने गुरचरण जागेत अतिक्रमण केल्याचे तहसीलदारांनी मान्य केले आहे. आदिवासी समाजाच्या जमिनी हडप केल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला न देता, जमिनी घेतल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे गोदरेज समूहाविरोधात कारवाई करण्याची मागणी खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांना याबाबत पत्र दिले होते. गोदरेज समूहाने अनधिकृत गौण उत्खनन केलेले आहे. सुमारे 22 कोटींची दंडात्मक कार्यवाही त्यांच्यावर करण्यात आली आहे. अनधिकृत गौण खनिजाचे उत्खनन व अतिक्रमणाची तात्काळ सखोल चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून केली होती. अखेर याबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत निर्णय घेण्यात आला. गुरचरण जागेसह आदिवासी समाजाची जमीन हडप केल्याचा ठपका या बैठकीत ठेवण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी संबंधित कंपनीवर कारवाई लवकरच केली जाईल, अशी माहिती बैठकीत दिली.

Exit mobile version