नियम पायदळी तुडविणार्‍या मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

दिवाळी सण सुरु झाला आहे. मात्र, प्रशासनाच्या कारवाईत ताळमेळ दिसत नसल्याने सर्रास दुकानदार घालून दिलेले नियम पायदळी तुडवत आहेत. ग्राहकांना चांगल्या दर्जाची उत्पादने मिळावीत यासाठी मिठाईचा टिकाऊपणा ग्राहकांना सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड अथोरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसआयए) त्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मिठाई पदार्थाचा ताजेपणाचा कालावधी अर्थात ‘बेस्ट बिफोर’ तारीख नमूद करणे दुकानदारांना बंधनकारक असल्याने ही तारीख पाहूनच खरेदीदारांनी मिठाई घ्यावी. याप्रकरणी अन्न औषध प्रशासनाने दिवाळीपूर्वी 14 जणांवर कारवाई केली आहे. यापैकी दोघांकडून दंड देखील वसुल करण्यात आला आहे.

शहरात चौकाचौकात स्वीट मार्टची दुकाने आहेत. बहुतांश दुकानदारांकडून नियमावलीचे पालन केले जात नाही. शिळी मिठाई विकली जात असून, यातून विषबाधा होण्याची शक्यता असते. पनवेल तालूक्यात मिठाईची मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. यामध्ये नीलकंठ, झामा सारख्या प्रसिद्ध मिठाई विक्रेत्या दुकानांचा समावेश असुन काही ठिकाणी नावाने प्रसिद्ध असलेली हि दुकाने देखील बेस्ट बिफ़ोरचा नियम पाळत नाहीत. पनवेलमध्ये मिठाईची तब्बल 300 दुकाने आहेत. रायगड जिल्ह्यासाठी अन्न औषध प्रशासनाचे केवळ चार अधिकारी कार्यरत आहेत. यापैकी एक अधिकारी रजेवर असल्याने तीन अधिकार्‍यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसून येते. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. यापैकी पनवेल हा सर्वात मोठा तालुका आहे.

नियमांचे पालन न करणार्‍या मिठाई विक्रेत्यांवर कारवाई सुरु केली आहे. 14 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन जण दोषी आढळल्याने 21 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम अशीच सुरु राहणार आहे.

एल.के. दराडे, उपायुक्त, अन्न औषध प्रशासन, रायगड
Exit mobile version