भाजपा, कार्यकर्ता आणि बिर्याणी…

रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमात कार्यकर्ते उपाशी

| खास प्रतिनिधी | रायगड |

कोरोना कालावधीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला उपाशी झोपू दिले नाही, असे आपल्या भाषणात सांगणाऱ्या मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मात्र आजच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उपाशी बसवले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांची उपासमार झाली. कार्यक्रमाची सांगता होताना आयोजकांनी बिर्याणी मागवली; परंतु, तोपर्यंत कार्यकर्त्यांनी घराचा रस्ता धरला होता.

अलिबाग-मुरुड विधानसभा बूथ कार्यकर्ता मेळव्यात सोमवारी कार्यकर्त्यांना वेठीस धरण्यात आल्याचे दिसून आले. दुपारी एक वाजता सुरु होणारा कार्यक्रम साडेतीन वाजता सुरु झाला. या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते सकाळपासूनच आले होते. त्यामुळे त्यांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. यामध्ये महिलांसह काही मुलांचे हाल झाले. पाणी पिऊन त्यांना आपली भूक भागवावी लागल्याचे सभेस्थळी दिसून आले.

आजचा बूथ कार्यकर्ता मेळावा नव्हता, तर रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपाचाच अधिकार आहे, असा संदेश मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) देण्याचा अटापिटा होता, हे स्पष्ट झाले. भाजपाने रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. यासाठी वक्त्यांनी राजकीय समीकरणे मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने तटकरे यांना विजयी करण्यासाठी शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार माणिक जगताप, आमदार भास्कर जाधव यांचा वाटा होता. मात्र, आजच्या घडीला तटकरे यांच्यासोबत यातील कोणीच नाही. त्यामुळे त्यांचा विजय कठीण असल्याचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी अधोरेखित केल्याचे दिसले. तटकरे हे जरी विद्यमान खासदार असले, तरी गेल्या पाच वर्षांत बराच बदल झाला असल्याचे त्यांनी नमूद करुन आपल्या खासदारकीची वाट मोकळी करुन घेण्याचा प्रयत्न केला.

विकासाच्या फक्त बाताच
रायगड जिल्ह्यात भाजपाच विकास करु शकतो, असे रवींद्र चव्हाण म्हणाले, मात्र गेल्या 12 वर्षांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही, अलिबाग-रोहा रस्ता रखडला आहे, जिल्ह्यातील बहुतांश पूल जीर्ण झाले आहेत. त्यांची दुरुस्ती अथवा ते नव्याने उभारण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सातत्याने स्फोट होऊन त्यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. याचा विसर चव्हाण यांना पडला. मुंबई-गोवा महमार्ग हा डिसेंबर 2024 अखरे पूर्ण करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने काहीच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. अद्याप पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही, हर घर नल योजनेचे पाणी नारिकांपर्यंत पोहोचलेले नाही, असे असताना रवींद्र चव्हाण कोणत्या विकासाच्या गप्पा मारतात, असा प्रश्न पडला आहे.
कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ
कार्यकर्ते उपाशी असल्याचे काही पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी बिर्याणीची ऑर्डर केली. मात्र, इतक्या कमी वेळात बिर्याणी मिळणे कठीण होते. थोड्या वेळात बिर्याणी येईल, असा धीर भुकेल्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी देत होते. काही कार्यकर्त्यांना कशासाठी आलो आहोत, हेदेखील माहिती नव्हते. त्यामुळे चांगलीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसले. कार्यक्रम संपताना बिर्याणी आली. मात्र, तोपर्यंत काही कार्यकर्त्यांनी उपाशी पोटीच घरचा रस्ता धरला होता. दरम्यान, आजच्या कार्यक्रमासाठी अलिबाग-मुरुड विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणे गरजेचे होते. मात्र, म्हणावी तशी कार्यकर्त्यांची गर्दी जमवण्यात आयोजकांना अपयश आल्याचे दिसले. पनवेल आणि उरणचे आमदार हे कार्यक्रम सुरु झाल्यानंतर पोहोचले.
Exit mobile version