। सोगांव । वार्ताहर ।
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. किहीम आदिवासीवाडी येथील आदिवासी बांधवांसोबत आपल्या कुटुंबासह उपस्थित राहत वाढदिवस साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने राजाभाऊ यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी 25 लाख रुपयांची देणगी जाहीर करत त्यातील 5 लाख रुपये रोख रक्कम व 5 लाख रुपयांचा धनादेश स्वरूपात आदिवासी बांधवांना सुपूर्द केला. किहीम समुद्रकिनारी हौशी बैलगाडी व घोडागाडी स्पर्धांचे आयोजन केले होते.
या स्पर्धांचे उद्घाटन राजाभाऊ ठाकुर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मोठमोठी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. यानंतर साईनगर किहीम येथे कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.