ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन; शिवाजी पार्कला होणार अंत्यसंस्कार

| मुंबई | अतुल गुळवणी |
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांचा मुलगा अभिनय देव यांच्या घरीच सीमा देव यांचं निधन झालं. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. तसंच विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ज्या मराठी कलावंतांनी नान कमावले त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गेली पन्नास-साठ वर्षे या जोडीने अनेक दर्जेदार मराठी आणि हिंदी चित्रपटात अनेकविध भूमिका साकारत रसिकांच्या मनात अढळ असे स्थान मिळविले. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला… हे सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायिलेले गीत आठवले की डोळ्यासमोर येतात ते रमेश देव, सीमा देव…सुवासिनी या गाजलेल्या मराठी सिनेमात जिवलगा कधी रे येशील तू, अथवा जगाच्या पाठीवर या राजा परांजपे यांच्या समवेत तुला पाहते रे तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते..अशा अनेक दर्जेदार चित्रपटातून सकस भूमिका करणारी सीमा देव यांनी रमेश देव यांच्या समवेत हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवित रसिकांच्या मनात स्थान मिळविले. विशेष करून राजेश खन्ना , अमिताभ बच्चन या दिग्गज कलावंत यांच्या समवेत केलेला आनंद मध्ये सीमा यांची भूमिका सर्वांच्याच लक्षात राहिली. याशिवाय सरस्वती चंद्र, ड्रीम गर्ल या सिनेमातील भूमिका प्रश्न दाद देऊन गेल्या.

रमेश देव यांनी निर्माण केलेल्या सर्जा, वासुदेव बळवंत फडके या सिनेमातही सीमा देव यांनी भूमिका साकारल्या आहेत. मराठी सिनमांसाठी ज्या महिला कलावंतांनी योगदान सीमा देव यांचा आवरजून उल्लेख करावाच लागेल. चार महिन्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या धक्क्यातून मराठी चित्रपट सृष्टी सावरत असतानाच सीमा देव यांनी या जगाचा निरोप घेत रसिकांना मोठा धक्का दिला.

जन्म, मृत्यू हे नियतीचे खेळ आहेत. ते प्रत्येकाच्या वाट्याला येतातच. पण आयुष्यात आपण काय कमावले, समाजासाठी काय देऊ शकलो हे सीमा देव, रमेश देव यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांचे अजरामर सिनेमे मराठी रसिकांना नेहमीच गुणी अभिनेत्रीची आठवण करून देतील. सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत 80 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती.

सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं. ‌‘आलिया भोगासी’ या सिनेमातून त्यांनी 1957 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुढे अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांंमधून काम केलं. आज अल्झायमर्स या आजाराने त्यांचं मुंबईतल्या जुहूमधल्या घरी निधन झालं. ‌‘जगाच्या पाठीवर’, ‌‘मोलकरीण’, ‌‘यंदा कर्तव्य आहे’, ‌‘या सुखांनो या’, ‌‘सुवासिनी’, ‌‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. ‌‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते. 2017 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Exit mobile version