घागरकोंडच्या झुलत्या पुलासाठी 20 लाखांचा निधी देणार
अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची ग्वाही

| पोलादपूर | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषदेने आतापर्यंत अतिवृष्टीबाधित रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी राखून वेळोवेळी रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी खर्च केला. पण, यंदा 22 जुलैच्या पावसाने जॅकवेल आणि पाणी योजनेसाठीदेखील रस्त्याप्रमाणेच निधी राखून ठेवण्याची गरज स्पष्ट केली आहे. पोलादपूर तालुक्यातील असंख्य पाणी योजनांची हानी झाली असताना बोरावळेच्या पाणी योजनेसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देत शेकापक्षाने भूमीपूजनाचा कार्यक्रम केला. याचप्रमाणे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या घागरकोंडच्या झुलत्या पुलासाठीदेखील 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याची ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी येथे दिली.

पोलादपूर तालुक्यातील बोरावळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बोरावळे येथील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना करण्याच्या कामाचा भूमीपूजन समारंभ अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या हस्ते शेकापक्षाच्या देवळे राजिप गटाच्या सदस्या सुमन कुंभार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती नंदा चांदे, उपसभापती शैलेश सलागरे, शेकापक्ष तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड, बोरावळे ग्रुपग्रामपंचायत सरपंच वैभव चांदे, माजी सरपंच निवृत्ती उतेकर, पुरोगामी युवक संघटना चिटणीस चंद्रकांत सणस, योगेश महाडिक, समीर चिपळूणकर, बापू जाधव, बबन साने, अजित कंक, यासिन करबेलकर तसेच पाणीपुरवठा कमिटी अध्यक्ष रामचंद्र मोरे व ग्रामस्थ तसेच महिला उपस्थित होते.
यावेळी तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड यांनी, पोलादपूर तालुक्यातील देवळे आणि कोंढवी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून शेकापक्ष स्वबळावर लढू शकेल, अशी कामे दोन्ही बाजूला केली असून निवडणुकीवेळी जसा पक्षश्रेष्ठी आदेश देतील, तशाप्रकारे सज्ज असू असे ठामपणे सांगितले. यावेळी रानवडीचे निवृत्ती उतेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मणबुवा खेडेकर यांनी विचार मांडले. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे तसेच बांधकाम विभागाचे अभियंताही उपस्थित होते.

Exit mobile version