। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सची मालकी असलेल्या सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सने संघातील बहुतांश हिस्सा विकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सीव्हीसीने 2021 मध्ये 5625 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन चार वर्षांसाठी फ्रँचायझी खरेदी केली होती.
बीसीसीआयने आयपीएलबाबत तयार केलेल्या नियमांनुसार, आयपीएल फ्रँचायझीची मालकी विकत घेणारी कोणतीही कंपनी निश्चित लॉक-इन कालावधीपूर्वी तिचा हिस्सा इतर कोणत्याही कंपनीकडे हस्तांतरित करू शकत नाही. सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सचा हा लॉक-इन कालावधी फेब्रुवारी 2025 मध्ये संपत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपने गुजरात टायटन्स फ्रँचायझीची मालकी खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
अदानी ग्रुपने फ्रँचायझीसाठी 5100 कोटी रुपयांची बोली लावली आहे, तर टोरेंट ग्रुपने 4653 कोटी रुपयांची बोली लावली आहे. गुजरात टायटन्स ही तीन वर्षे जुनी फ्रँचायझी आहे. तिचे मूल्य एक अब्ज डॉलर्स ते दीड अब्ज डॉलर्स दरम्यान असू शकते. आता गुजरात टायटन्सची मालकी कोणता ग्रुप घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.