भाजपसह काँग्रेस सोडणार्यांना निशाणा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सत्य लपवण्यासाठी, ते दररोज भटकवतात. प्रश्न एकच आहे- अदानींच्या कंपन्यांमधील 20,000 कोटींचा बेनामी पैसा कोणाचा आहे, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपसहित काँग्रेस सोडून गेलेल्या नेतेमंडळींना केला आहे. यावरुन आता पुन्हा एकदा राजकीय विवाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मोदी आडनाव प्रकरणात सदस्यत्व गमावलेले राहुल गांधी सातत्याने अदानी प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पण, शनिवारी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आता भाजपवासी झालेल्या माजी काँग्रेसजनांवर निशाणा साधला. राहुल गांधींच्या ट्विटमध्ये एका वर्ड प्ले पझलचा फोटो दाखवण्यात आला, ज्यात केंद्रस्थानी अदानी लिहिले आहे. पण, त्याच फोटोवर त्यांच्या जुन्या सहकार्यांची नावेही लिहिली आहे. ज्यांनी आता काँग्रेस आणि राहुल गांधी यांची साथ सोडली आहे.
राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले की, सत्य लपवण्यासाठी, ते दररोज भटकवतात. प्रश्न एकच आहे- अदानींच्या कंपन्यांमधील 20,000 कोटींचा बेनामी पैसा कोणाचा आहे? यामध्ये गुलाम नबी आझाद, सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंत बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांचा समावेश आहे.
ते पवारांचे व्यक्तिगत मत- जयराम
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी समूहाच्या जेसीपी चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीचे एका मुलाखतीत स्वागत करताना शरद पवार म्हणाले की, त्यांची चौकशी सुरू आहे, त्यामुळे सत्य बाहेर येण्याची अधिक आशा आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर जेपीसी चौकशीला महत्त्व राहणार नाही. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं निवेदन जारी केलं आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, हे त्यांचे (शरद पवार) स्वतःचे विचार असू शकतात. जयराम रमेश म्हणाले, याप्रकरणी 19 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही सर्वजण हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर मानतो. यासोबतच राष्ट्रवादीसह 20 विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्र असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
हिमंत शर्मांचे आव्हान
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोत आपलं नाव पाहून हिमंत बिस्वा शर्मा संतापले. बोफोर्स आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील रक्कम तुम्ही कुठे लपवली, हे आम्ही तुम्हाला कधीच विचारले नाही. तसेच तुम्ही ओटावियो क्वात्रोचीला अनेकवेळा भारतीय न्यायव्यवस्थेच्या तावडीतून कसे सुटू दिले, हेही विचारलं नाही. पण, आता आपण न्यायालयात भेटू, असा सूचक इशाराही शर्मा यांनी दिला.
