राजकीय वाटचालीत रायगड जिल्हा परिषद हा महत्त्वाचा टप्पा – अदिती तटकरे

कर्जत येथे रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
। नेरळ । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यावर ज्या ज्यावेळी संकटे आली, त्या त्यावेळी जिल्ह्यातील शिक्षक वर्ग मदतीला धावला आणि त्यामुळे आलेल्या संकटांना परतवून लावता आले, अशी भावना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा कार्यक्रमात बोलताना व्यक्ती केली. तर, आपल्या राजकीय वाटचालीत जि.प. अध्यक्ष म्हणून काम केल्याने यशस्वी होत असल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी कबूल केले. दरम्यान, प्रतीक जुईकर यांच्यासारखे आयएएस अधिकारी जिल्ह्यात निर्माण व्हावेत यासाठी जिल्ह्यात शासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अदिती तटकरे यांनी या कार्यक्रमात केली.

कर्जत तालुक्यातील किरवली येथील शेळके बंधू मंगल कार्यालयात रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि शिक्षतेतर कर्मचारी अशा 2020 आणि 2021 मधील 90 जणांचा सन्मान रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद योगिता पारधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीचे सभापती सुधाकर घारे यांच्यासह शिक्षक आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार सुरेश लाड, बांधकाम समिती सभापती नीलिमा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, कृषी समिती सभापती बबन मनवे, गीता जाधव, जिल्हा परिषदेमधील प्रतोद आस्वाद पाटील, बबन चाचले, माजी सभापती नरेश पाटील, नारायण डामसे, उमा मुंढे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी रणधीर सोमवंशी, कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुषमा ठाकरे, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य प्रभाकर म्हात्रे, सदस्य आणि म्हसळा सभापती छाया म्हात्रे, विजय भोईर, सुरेश खैरे, अनसूया पादिर, सहारा कोळंबे, सीमा पेमारे, डी. बी. पाटील, रेखा दिसले, सभापती तळा हर्षदा कदम, कर्जत उपसभापती जयवंती हिंदोळा, सुजाता मनवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र आवाज गायक वैभव थोरवे यांच्या आवाजातील गीतांनी झाली. जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक ज्ञानदा फणसे, माध्यमिक विभाग जोत्सना शिंदे पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस अधिकारी प्रतीक जुईकर यांचा विशेष सत्कार पालकमंत्री अदिती तटकरे यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण समिती सभापती सुधाकर घारे यांनी केले.

यावेळी बोलताना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार अदिती तटकरे यांनी बोलताना आपल्या आईवडिलानंतर दुसरे स्थान असते ते शिक्षक,त्या गुरुजन वर्गाचे ऋण व्यक्त करताना आणि आभार मानण्याची गरज आहे.शिक्षकांनी आणि गुरुजन वर्गाने प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार होत आहेत, पण हा सन्मान जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा आहे. गावागावात ज्या ज्यावेळी काही समस्या शिक्षकांचा विषय येतो त्यावेळी ग्रामस्थ देखील उपस्थित असतात.अशाप्रकारे नाळ शिक्षक आणि ग्रामस्थ यांची जुळलेली असते.शिक्षण क्षेत्रात पालकांची अपेक्षा ही शाळेकडून आणि आपल्या सारख्या आदर्श शिक्षक यांच्याकडून असते आणि हे जन्मापासून घरोघरी चित्र असते. आज प्राथमिक शाळेत शिकलेला विद्यार्थी आयएएस झालेला दिसतो हे सर्व आपल्या सारख्या गुरुजन वर्गामुळे शक्य झाले आहे. प्रतीक जुईकर यांच्या मुळे आपल्या सारख्या प्राथमिक शिक्षकांवर अधिक जबाबदारी येऊन पडली आहे याची सर्वांना जाणीव कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना कोव्हिड काळात पुरस्कार झाला नव्हता, मात्र शिक्षक वर्गाचा आग्रह होता. कार्यक्रम घेण्याचे नक्की झाल्यावर आमच्या स्थायी समितीने नंतर मागील दीड महिने सातत्याने आढावा घेऊन हा सोहळा संपन्न होत आहे. जिल्ह्यातील विकासकामे आणि शिक्षक पुरस्कार यांचा आढावा घेतल्यानंतर चंद्रशेखर जुईकर यांचा सुपुत्र जिल्ह्यातील पहिला आयएएस झाला आहे. असे कार्य जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत आयएएस व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी यावेळी बोलताना कर्जत येथे होत असलेला हा सत्कार सोहळा यापूर्वीच्या सर्व सोहळ्यात दिमाखदार झाला असे नमूद करीत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याला सोनेरी साज आपल्या जिल्ह्यातील पहिला आयएएस अधिकारी प्रतीक जुईकर यांच्या उपस्थितीने चढला आहे. रायगड जिल्हा परिषद या ठिकाणी प्रथमच शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करीत असताना त्यांचादेखील शिक्षण विभागात महत्त्वाचा वाटा असतो याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे हेदेखील बाळाराम पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

कर्जत तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी म्हणून स्नेहा राजेंद्र गलगले,वैष्णवी शशिकांत हजारे,श्रावणी मिलिंद गुजराथी,देवर्षी उदय गुजराथी,सुजल रमेश पालकर,यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला,तर रायगड जिल्ह्यातील अन्य 14 तालुक्यातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना त्या त्या तालुक्यातील कर्जत येथील विद्यार्थी सत्कार झाल्यानंतर सर्व तालुक्यात तेथील गटविकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

माझेकडे जे आहे ते सर्व स्पर्धा परीक्षा देणार्‍यांना देणार-प्रतीक जुईकर
शैक्षणिक हब असलेल्या कर्जत आणि रायगड जिल्ह्याला पहिला अधिकारी हे ऐकायला बरे वाटते पण एकच अधिकारी ही खंत असून माझ्याकडे जे जे आहे ते सर्व विद्यार्थ्यांना द्यायला तयार आहे.त्यातून अनेक आयएएस अधिकारी बनतील अशी अपेक्षा व्यक्त प्रतीक जुईकर यांनी केली.

Exit mobile version