| सुधीर नाझरे | मुरुड जंजिरा |
मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध अशा फणसाड अभयारण्यात पक्षीप्रेमी संघटना व फणसाड अभयारण्याचा कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम करून तीन दिवसांत 54 चौरस किलोमीटर पिंजून काढून विविध पक्षी शोधून काढून याची माहिती प्रशासनास सादर केली आहे. त्यामुळे फणसाड गतवैभवात भर पडत असून, पक्ष्यांची संख्या वाढती असल्याचे दिसून येत आहे. समुद्रसपाटीपासून अगदी जवळ व महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य म्हणजे फणसाड अभयारण्य आहे. येथे विविध वन्य जीव, विविध औषधी वनस्पती, पक्षी यांचा मोठा साठा आढळून आल्याने पर्यटकांची पावले येथे फिरकत आहेत. महाराष्ट्र वनविभाग आणि ग्रीन वर्कस् ट्रस्ट यांनी एकत्रितरित्या जानेवारी महिन्यात तीन दिवसांचे फणसाड वन्यजीव अभयारण्य येथे तिसर्या पक्षीगणनेचे आयोजन केले होते. कोरोना संबंधित पूर्ण दक्षता घेऊन ही गणना पार पाडण्यात आली. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता 45 ऐवजी 28 पक्षी निरीक्षक या उपक्रमात सहभागी झाले.
तीन दिवसांच्या कालावधीत येथे 162 पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. केंटीश प्लोव्हर, ब्लुइथ्रोट, पडद्यफिएल्ड वॉरब्लेर, येल्लोव-ब्रॉवेद वॉरब्लेर या पक्ष्यांची नोंद पहिल्यांदाच अभयारण्यात झाली.पक्ष्यांव्यतिरिक्त इंडियन फॉरेस्ट स्कॉर्पिओन, इंडियन व्हीओलेतं टारांटूला, बर्ड द्रोपंपिंग स्पायडर, ग्रीन हुंट्स्मन स्पायडर या दुर्मिळ अष्टपाद प्राण्यांचे दर्शन झाले. याबाबत अधिक माहिती सांगताना फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी सांगितले, की ग्रीन वर्कस् ट्रस्टचे सर्व सहकारी व फणसाड अभयारण्यातील कर्मचारी वृंदांनी तीन दिवसांत फणसाडच्या विविध ठिकाणी जाऊन विविध पक्ष्यांची नोंद घेतली आहे.
दुर्मिळ फुलपाखरांचे दर्शन
महाराष्ट्रात गुहागरपासून दक्षिणेला दिसणार्या भीमपंखी या भारतातील सर्वात मोठ्या फुलपाखराचे दर्शन दुसर्या पक्षीगणनेतसुद्धा झाले आहे. यंदा हे फुलपाखरू पक्षी गणनेदरम्यान पाच वेगवेगळ्या ठिकाणी दिसले. शिवाय, डार्क पीएर्रोट, थ्री-स्पॉट ग्रास येल्लोव, स्पॉटलेस ग्रास येल्लोव या ही दुर्मिळ फुलपाखरेदेखील दिसली आहेत.
- पक्षीगणना ही खूप आवश्यक असून, यामुळे अभयारण्यात असणार्या पक्ष्यांच्या विविध जाती कळतात. त्याची प्रसिद्धी झाल्याने पर्यटक व पक्षीप्रेमी येथे आवर्जून भेट देतात. त्यामुळे फणसाडच्या महसूलवाढीला मोठा हातभार लागत असतो. – राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, फणसाड