आ. गोगावले, आ. महेंद्र थोरवे यांची मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
आम्ही महाविकास आघाडीच्या सत्तेत अडीच वर्षे ज्यांना विरोध केला, त्या अदिती तटकरे यांना कदापि पालकमंत्री करू नये, अशी मागणी रायगडातील शिंदे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचे कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथे जाहीर केले. आ.भरत गोगावले यांनीही एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना अदिती तटकरेंना रायगडचे पालकमंत्रीपद देऊ नये, त्याला आमचा ठाम विरोधच राहिल, याचा पुनरुच्चार केला आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर कर्जत येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना थोरवे यांनी आपल्या वाट्याची मंत्रिपदे अचानक सोबत आलेल्या अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना दिली गेली आहेत. अशावेळी आमचा हक्क आणि अधिकार सध्यातरी हिरावून गेला आहे. त्यामुळे आम्ही नाराज असल्याचे आवर्जून नमूद केले. तसेच रायगड जिल्ह्यातील थोरवेंचे सहकारी भरत गोगावले यांना मंत्री करावे, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी तसे होईल असा शब्द दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे आमदार थोरवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्रात शिंदे आघाडी आणि ठाकरे आघाडी असे बघायला मिळणार आहे. मात्र कर्जतमधील समीकरण वेगळेच बघायला मिळणार आहे. भले महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस-ठाकरे गट आणि काँग्रेस आहे. मात्र कर्जतमध्ये काँग्रेस ही राष्ट्रवादीवर नाराज असल्याने ते शिंदे गटासोबत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कर्जतमध्ये नक्कीच ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. त्यामुळे माजी आमदार सुरेश लाड यांना पुन्हा जोरदार ताकद लावावी लागणार आहे. याचे कारण म्हणजे ठाकरे गटात सक्षम नेतृत्व करायला नेता नाही आणि काँग्रेसला कोणी वाली नाही. त्यात राष्ट्रवादीचे आमदारकीचे स्वप्न बघू इच्छिणारे हे नेते सरकारमध्ये समावेश झाले आहेत. त्यामुळे त्यांना मानणारे कार्यकर्ते हे त्यांच्यासोबत असणार आहे. तर लाड यांना कार्यकर्ते जमवाजमव करण्यासाठी नक्कीच जोर लावावा लागणार आहे आणि त्यासाठी तयार व्हा, असे आवाहन थोरवे यांनी केले.