। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील रखडलेल्या रस्त्यांवरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत आणि कामं बंद आहेत. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. तसेच, ‘एसंशि’ने खिसे भरले मात्र, रस्त्यांमध्ये माल भरला नाही, असा जोरदार हल्ला त्यांनी महायुती सरकार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चढवला आहे.
आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (दि. 10) वरळी मतदारसंघात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारच्या इशार्यावर चालणार्या पालिकेच्या प्रशासक राजवटीत मुंबई लुटण्याचे काम झाले. हा घोटाळाच सरू असल्याचे 2023-24 मध्येच सांगितले होते. तसेच, महापालिकेतील अधिकारी काम करतात परंतु, काँन्ट्रक्टर पळून जातात. 15 जानेवारी 2023 ला मी रस्त्याचा घोटाळा समोर आणला होता. 2024 चे टेंडरही तसेच होते. आताही अधिवेशनात नगरविकास मंत्री पाच मिनिटांत बैठकीतून पळून गेले, असा टोला त्यांनी लगावला.
कोरटकरच्या जामिनामुळे स्पष्ट झाले आहे की, भाजप सत्तेत असताना काहीही बोललेले चालू शकते. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे तसेच आवडते असल्यामुळे हे सर्व चालते. यातून त्यांनी देशाला एक मेसेज दिला आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आदी महापुरुषांचा अवमान करू शकता. कारण सत्ता भाजपची आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असलयामुळे महागाई, टॅरिफ, अर्थव्यवस्थेवर बोलायचे सोडून फक्त हिंदू मुस्लिमावर चर्चा सुरू आहे. ठाण्यातील कोपरी पूल सहा महिन्यांत फुटायला लागला आहे. जशी ‘एसंशि’ गटाची क्वालिटी तशीच रस्त्याची क्वालिटी झाली आहे.
– आदित्य ठाकरे, शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते