। पोलादपूर । प्रतिनिधी ।
महाड आणि पोलादपूर तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील महिला व पुरूषांसाठी वैयक्तीक तसेच सामाजिक विकासासह आदिवासी वाड्यांच्याही विकासासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांनी व्यक्त केले आहे.
श्रमजिवी जनता सहाय्यक मंडळ आणि सावित्री आदिवासी सहकारी पतसंस्थेतर्फे आदिवासी आदिशक्ती वार्षिक संमेलन मेळाव्याचे आयोजन येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शैलेश पालकर बोलत होते.
यावेळी पालकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्याच्या आणि केंद्राच्या आदिवासी विकास योजनांची संख्या पाहता देशातील आदिवासी मागासलेला राहण्याची सुतराम शक्यता नाही. केवळ आदिवासींसाठी निर्लोभी भावनेने काम करणार्यांची संख्या कमी असल्यानेच सध्या आदिवासी बांधव भगिनींना विकासापासून वंचित असल्याचे पाहावे लागत आहे. पोलादपूर तालुक्यातील आदिवासी शिक्षण, आरोग्य, रस्ते, निवारा आणि रोजगारापासून वंचित असताना गेली 10-15 वर्षे श्रमजिवी जनता सहायक मंडळाने केलेल्या कामामुळे आदिवासी संघटितपणे एकत्र येऊ लागला आहे. आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालय, शहरातील नामांकित निवासी शाळांमध्ये आदिवासी पाल्यांना शिक्षण, पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयम योजना, आहार, वाहनचालक प्रशिक्षण, आदिवासी सेवक व संस्था पुरस्कार तसेच ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा अशा विविध योजनांची माहिती पालकर यांनी सांगीतली. यावेळी आदिवासी आधार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग वाघे, सावित्री आदिवासी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सुनिता हिलम, व्यवस्थापक विठ्ठल कोळेकर, व्हाईस चेअरमन कुंदा जगताप, सुरेश हिलम, काशी वाघमारे, वत्सला जगताप, जयराम जाधव, संदीप वाले, सुरेखा जाधव, जना जाधव आदी संचालक तसेच मेघा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.