कोल्हारे ग्रामपंचायतीमधील 39 कुटुंबं प्रतीक्षा यादीवर
| नेरळ | प्रतिनिधी |
कोल्हारे ग्रामपंचायतीमधील अनेक कुटुंबं मागील अनेक वर्षे घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. 39 लाभार्थी हे लाभाच्या प्रतीक्षेत असून, त्यांना घरकुल मिळत नसल्याने स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि एका स्वयंसेवी संघटनेने दोन आदिवासी कातकरी कुटुंबांना घरकुल बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये कोल्हारे तेथे एक कातकरी समाजाची वस्ती आहे, तर धामोते येथे लायकर समाजाची वस्ती आहे. लोकसंख्येनुसार कर्जत पंचायत समितीकडून एका वर्षाला केवळ तीन घरकुलं मंजूर केली जातात. त्यामुळे कोल्हारे ग्रामपंचायतीची लाभार्थी यादी दरवर्षी वाढत चालली आहे. सध्या या ग्रामपंचायतीमधील इंदिरा आवास योजनेतून घरकुले मिळविण्यासाठी बनविण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीत तब्बल 39 कुटुंबांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्या 39 कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास किमान बारा वर्षे लागणार आहेत. त्यावेळी लाभार्थी संख्या दरवर्षी वाढत जाणार असल्याने खरोखर गरीब असलेल्या आणि पक्क्या घरापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलं मिळतील काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात कोल्हारे ग्रामपंचायतीमधील कोल्हार वाडीमधील आदिवासी लोक हे कातकरी समाजाचे असून, त्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे तेथे घरकुल आवास योजनेचा लाभ न मिळालेल्या कुटुंब आजही कुडामेडीच्या घरात राहात आहेत. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती चांगली असल्याने ग्रामपंचायत निधीमधून अशा कुडामेडीच्या घरात राहणार्या कातकरी समाजाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करता येऊ शकते.
मात्र, दुसरीकडे ग्रामपंचायतीमध्ये तीन गावे असताना केवळ एकाच गावातील तिन्ही घरकुले पंचायत समिती कडून मंजूर करून घेण्यात आली आहेत. परंतु, ग्रामपंचायत कुडामेडीचे घरात राहणार्या आदिवासी कातकरी कुटुंबांसाठी काहीही करीत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कातकरी वाडीमधील अनंता गोपाळ वाघे आणि गोपी रमेश भोसले या दोन लाभार्थींची घरे दुरुस्त करून देण्यासाठी विजय हजारे यांनी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पुढाकाराची दखल घेवून तेजस्वी सामाजिक संस्था यांच्याकडून अर्थसहाय्य करण्याचा निर्णय या संस्थेने घेतला आहे. त्या कुडामेडीच्या घराची दुरुस्ती करण्यासाठी तेजस्वी संस्था 60 हजारांची मदत करणार आहे. तर, विजय हजारे हे 60-70 हजार खर्च करून नवीन घर बांधून देणार आहेत. त्या घरबांधणी कामासाठी वाघे कुटुंब श्रमदान करणार आहेत. वाघे यांच्या घराचे काम पूर्ण झाल्यावर विजय हजारे आणि तेजस्वी संस्था यांच्याकडून गोपी भोसले यांच्या कुडामेडीच्या घराचे काम हाती घेतले जाणार आहे. शुक्रवारी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनंता गोपाळ वाघे यांच्या घराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन्ही घरांची कामे पूर्ण करून घेण्याचा ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांचा प्रयत्न आहे.







